पुरुषोत्तम करंडकावर अहमदनगरच्या ‘लाली’ची मोहोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:29 PM2019-12-30T15:29:57+5:302019-12-30T15:34:04+5:30
रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाची ‘मर्सिया’ द्वितीय
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत अहमदनगरच्या न्यू कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयाच्या ‘लाली’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. महाविद्यालयास सांघिक प्रथम पारितोषिकासह ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. प्रायोगिक एकांकिकेच्या पुरस्कारासाठी त्या गटातील एकही एकांकिका पात्र ठरली नाही.
पुण्यासह नागपूर, अमरावती, जळगाव, कोल्हापूर आणि रत्नागिरी केंद्रातून महाअंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या १७ एकांकिकांचे सादरीकरण भरत नाट्य मंदिरात झाले. रविवारी (दि. २९) विजेत्या संघांना ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक शाम जोशी, शुभांगी दामले आणि प्रा. प्रवीण भोळे उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक द्वितीय (रोख ३००१ रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र) - मर्सिया (मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी), सांघिक तृतीय (रोख २००१ रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र) - मोठ्ठा पाऊस आला आणि... (दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड).
वैयक्तिक पारितोषिक : सर्वोत्कृष्ट अभिनय - संकेत जगदाळे (भूमिका - किसन्या, एकांकिका - लाली, न्यू कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालय, अहमदनगर).
अभिनय नैपुण्य पुरुष - ऋषिकेश जाधव (भूमिका - नाना, एकांकिका - एक्सपायरी डेट, राजाराम बापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, राजाराम नगर, इस्लामपूर).
अभिनय नैपुण्य स्त्री - कादंबरी माळी (भूमिका अक्का/सुभद्रा, एकांकिका - मोठ्ठा पाऊस आला आणि.., दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड,).
सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य - रेणुका ठोकळे (भूमिका आवली, एकांकिका - लाली, न्यू कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालय, अहमदनगर).
सर्वोकृष्ट दिग्दर्शक - कृष्णा विलास वाळके (लाली, न्यू कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालय, अहमदनगर).
अभिनय नैपुण्य उत्तेजनार्थ : (रोख १००१ रुपये, प्रशस्तिपत्र) (विद्यार्थी, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने) - संचिता जोशी (ऋत्वा, वन डे सेलिब्रेशन, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय रत्नागिरी), भावना काळे (आई, मॅट्रिक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद), राकेश इंगवले (जग्या, गेला शाम्या कुणीकडे, दत्ताजीराव कदम कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी), महेश गवंडी (तात्या, गेला शाम्या कुणीकडे, दत्ताजीराव कदम कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी), निखिल पाटील (बाळ्या, रंगबावरी, एम. जी. एस. एम. संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा).
गिरीजा पातुरकर (समिधा, पारो, विद्या भारती महाविद्यालय, अमरावती), वैभवी पवार (अहिल्या (आई), मर्सिया, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी), आशिष भागवत (मुका, मोठ्ठा पाऊस आला आणि.., दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड,), आकाश सुतार (आबा, टँजंट, श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), आर्या घाडगे (कुसुम, फ्यॅड, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे)
मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष अनंत निघोजकार यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार अॅड. राजेंद्र ठाकूर-देसाई यांनी केले.
.......
नाटकाचे व्याकरण, तंत्र समजून घ्या : प्रवीण भोळे
एकांकिका सादर करताना आजच्या काळातील प्रश्न अपवादानेच मांडले गेले हे आश्चर्य आहे. आपण आपल्या भवतालाकडे, आयुष्याकडे डोळे उघडून पाहत नाही, हे जाणवले असल्याचे मत प्रा. प्रवीण भोळे व्यक्त केले. नाटक ही एक स्वयंभू कला आहे. आपल्या भोवती घडणाºया नाटकाकडे, जगण्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला पाहिजे.
...........
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करा : चं. प्र. देशपांडे
विद्यार्थ्यांनी लेखनाकडे वळताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी व्यक्त केली. स्वत:ची सर्जकता टिकवून परिवर्तनवाद टाळला पाहिजे. नाटक हे मानवी संबंधांचेच असले पाहिजे. त्याची समज घेणे हे कलेचे कार्य आहे. अनुभवाची समज व्यक्त केली पाहिजे. संस्कृती निर्माण करणारी कला मानवी स्वभावाचे भान घेणारी असावी.