वारा-वादळ कधी येणार, ‘एआय’ अचूक सांगणार, हवामान विभागाला दीडशे वर्षे पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:43 AM2024-01-15T06:43:19+5:302024-01-15T06:43:33+5:30
‘एआय’मुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.
पुणे : हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी आता ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्यात येणार असून, त्यामुळे अधिक अचूक माहिती मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. वादळी वारे, मुसळधार पाऊस, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तींची माहिती आधीच समजणार आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे देशात तीन हजार जणांना जीव गमवावा लागला होता. ‘एआय’मुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.
माहितीचे डिजिटायझेशन
हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी दीडशे वर्षांपासूनच्या नोंदींचा वापर केला जातो. १९०१ पासूनच्या माहितीचे डिजिटायझेशन केले आहे. हा डेटा ‘एआय’साठी वापरून त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. सध्या ओडिशा व मध्य प्रदेशात वादळ, मुसळधार पावसाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी टेस्टिंग युनिट बनवीत आहे.
सिमला ऑफिसला मोठा ठेवा!
१५ जानेवारी १८७४ रोजी सिमला येथे हवामान विभाग स्थापन केला. त्यानंतर तो शिवाजीनगर येथे पुण्यात हलविला गेला. त्यासाठी दगडी इमारत बांधली. येथे १८७४ पासूनच्या नोंदवह्या आजही पाहायला मिळतात. त्याचे डिजिटायझेशन केले आहे.