पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात ५ लाख मोफत लसीकरणाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:09+5:302021-09-26T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग केले. त्याच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग केले. त्याच धर्तीवर मुंबईत धारावी भागात काम केले गेले. त्याला चांगला प्रतिसाद लाभल्याने साथ आटोक्यात आली. त्याचवेळी स्वयंसेवकांनी कोविड सेंटर सुरू केल्याने अनेकांना प्रेरणा मिळाली. संघाने नेहमीच समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणून काम केले. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण गरजेचे होते. त्यामुळे पुण्यात वस्त्या, गल्ल्यांमध्ये जाऊन दीड लाख लसी मोफत देण्यात आल्या. आता पश्चिम महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ५ लाख लसीचे उद्दिष्ट असल्याचे संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी सांगितले.
पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचालित बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि पीपीसीआर यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब वर्गातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण अभियान राबविले जात आहे. अभियानाची माहिती देण्यासाठी शनिवारी सावरकर अध्यासन केंद्र येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, विश्वस्त डॉ. बहार कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. दबडघाव म्हणाले की, पुणे महापालिका लसीकरणासाठी ७५ संस्थांचा सहभाग लाभला. आतापर्यंत पुण्यात ३८५ शिबिरे झाली. नाशिकच्या आदिवासी भागातही लसीकरण केले गेले. आता पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली, सातारा व नाशिक या चार जिल्ह्यांत अभियान सुरू आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावला यांनी मोफत लसी उपलब्ध करून दिल्या आहे.