भुलेश्वर डोंगर परिसर दाट वृक्षांचे जंगल बनविण्याचे ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:22+5:302021-06-06T04:08:22+5:30
यवत : भुलेश्वर डोंगर परिसरात वृक्षांची लागवड आणि संवर्धन करून जंगल निर्माण करण्यासाठी यवत ग्रामपंचायत, वनविभाग व ...
यवत : भुलेश्वर डोंगर परिसरात वृक्षांची लागवड आणि संवर्धन करून जंगल निर्माण करण्यासाठी यवत ग्रामपंचायत, वनविभाग व हरित वारी फाउंडेशन संयुक्त योगदान देणार असून, गावातील तरुण हरित हिरोंच्या माध्यमातून भविष्यात येथे दाट जंगल करण्याचे ध्येय असल्याचे सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यवत ग्रामपंचायत, वनविभाग व हरित वारी फाउंडेशन यांनी संयुक्त उपक्रम राबवित भुलेश्वर डोंगररांगांमध्ये ५० मोठ्या देशी वृक्षांची लागवड केली. या वेळी उपसरपंच सुभाष यादव, यवतचे वनपाल जी. एम. पवार, वनरक्षक सचिन पुरी, दीपाली पिसाळ, सुनीता शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे, सुजाता कुदळे, लंका कोळपे, कोमल कदम, उज्ज्वला शिवरकर, मंदाकिनी कुदळे, सोमनाथ रायकर, विकास दोरगे, दीपक तांबे उपस्थित होते.
समीर दोरगे म्हणाले, भुलेश्वर डोंगर परिसरात शेकडो हेक्टर वन विभागाची जागा आहे. या भागात अनेक ठिकाणी झाडे लावण्यासाठी मोकळी जागा आहे. सद्य परिस्थितीत येथे तुरळक वृक्ष आहेत. अनेक ठिकाणी कुबाभळ व निरूपयोगी झाडे येथे आहेत. हरित वारीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वड, पिंपळ, कडुलिंब, करंजे, चिंच, जांभूळ आदी देशी वृक्षांची लागवड केली जात आहे. झाडे लावताना लहान रोपे न लावता मोठी झालेली झाडे नर्सरीमधून आणून लावली जातात. यामुळे रोपांना लावाव्या लागणाऱ्या लोखंडी जाळी अथवा कुंपण याचा खर्च वाचतो, तसेच लवकर झाडे मोठी होऊ लागतात.
भुलेश्वर देवस्थान परिसरातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. तर निसर्गप्रेमींसाठी भटकंतीचे ठिकाण आहे. वन्यजीव, पशूपक्षी संपदादेखील येथे आहे. जंगल वाढल्यास पर्यावरणाला फायदा होऊ शकतो. आजूबाजूच्या गावांनीदेखील वन विभागाशी संपर्क साधून भुलेश्वर डोंगरात वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केल्यास हा उपक्रम राज्यात आदर्श ठरू शकतो. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन यवतचे सरपंच समीर दोरगे व उपसरपंच सुभाष यादव यांनी या वेळी केले.
०५ यवत
वृक्षलागवडप्रसंगी उपस्थित असलेले समीर दोरगे, सुभाष यादव, जी. एम. पवार व इतर.