अवैध वाळूउपशाविरोधात हवा एल्गार
By Admin | Published: December 22, 2015 01:31 AM2015-12-22T01:31:28+5:302015-12-22T01:31:28+5:30
वाळूव्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भिगवण येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित वाळूमाफिया संजय
वाळूव्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भिगवण येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित वाळूमाफिया संजय तनपुरे व त्याच्या तीन साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली शासन यंत्रणेकडून सुरू झाल्या आहेत. अवैध व बेसुमार वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडतो. याहीपेक्षा त्यामुळे पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. निसर्गचक्र कोलमडत आहे. याचा विचार होऊन वाळूच्या अमर्याद उपशाविरुद्ध सर्वसामान्यांनी एकत्र आले पाहिजे.
शासनाने अशा एक-दोघांवर कारवाई करण्याऐवजी, समस्यांच्या मुळाशी जाऊन ती समस्या खणून काढली पाहिजे. मुख्यत्वे महसूल विभागाला आणखी अधिकार देऊन, त्यांच्या संरक्षणासाठी ही उपाययोजना केली पाहिजे. इंदापूर तालुक्याचा विचार करता, भीमा व नीरा अशा दोन नद्यांमध्ये हा तालुका वसलेला आहे. या नद्यांचे काठ व संगमाकडील भागात गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार वाळूउपसा झाला आहे. सोलापूर, पुणे, नगर भागातील वाळूमाफिया बिनधास्तपणे वाळूचोरी करत आहेत. सोलापूर जिल्हयातील मोहोळ ते पुणे शहरापर्यंत सुमारे दोनशे किलोमीटर अंतरात त्यांची संघटित साखळी निर्माण झाली. मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअॅपसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून ते एकमेकांच्या व पोलीस खाते, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असतात. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक बहुतेक बनावट असतात, तर कधी चलाखी करून पुढे वेगळा व मागे वेगळा क्रमांक टाकलेला असतो. त्यातच पोलीस यंत्रणेची ‘कार्ड सिस्टीम’ वाळूचोरांचा कायद्याच्या कचाट्यापासून वाचवण्याचे काम करत असते.
इंटरनेटवर आधारित संपर्क माध्यमांमुळे महसूल विभाग, पोलीस यंत्रणा मिळून कारवाई करणार असेल, तर ते काही क्षणांतच वाळूमाफियांना समजते. ते तातडीने सुरक्षित ठिकाणी जातात अथवा ज्या रस्त्यावर भरारी पथके आहेत, त्या रस्त्याकडे फिरकतच नाहीत. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मागे पुढे शस्त्रधारी वाळूमाफियांच्या आलिशान चारचाकी गाड्या असतात. डॉन, भाई असल्याची हवा डोक्यात भरलेले हे ‘भाई’ सोबत शस्त्र, गाठीला पैसा, राजकीय वरदहस्त असल्याने काहीही करावयास मागेपुढे बघत नाहीत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या भरारी पथकामध्ये असणारांकडे बरीचशी कागदपत्रे, शिक्के अन्य जास्तीत जास्त दोनेक पोलीस कर्मचारी असतात. ही मंडळी तशी जिवावर उदार होऊनच काम करत असतात. वरिष्ठांनी मानेवर दिलेल्या उद्दिष्टाच जोखड त्यांना कर्तव्य पार पाडायला भाग पाडत असते. जर कुणा एकाची भाईगिरी मेंदू सोडून वागली तर या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.