एअर एशियाचे पुणे -दिल्ली विमान रद्द, प्रवाशांची गैरसोय; विमानतळावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:56 PM2018-04-22T22:56:09+5:302018-04-22T22:56:09+5:30
एअर एशियाचे पुण्याहून सायंकाळी ६ वाजता दिल्लीला जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले़
पुणे : एअर एशियाचे पुण्याहून सायंकाळी ६ वाजता दिल्लीला जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले़ पण त्याची कोणतीही माहिती प्रवाशांना उशिरापर्यंत न दिल्यामुळे सुमारे १५० प्रवासी रात्री उशिरापर्यंत लोहगाव विमानतळावर खोळंबून राहिले होते़ दुसरीकडे त्यांना एअर एशियाच्या अधिका-याकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती किंवा काहीही सोय न केल्याने त्यातील अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला़
एअर एशियाचे पुण्याहून ६ वाजता निघणारे विमान रात्री ८़१५ वाजता दिल्लीत पोहचणे अपेक्षित होते़ सर्व प्रवासी त्याप्रमाणे वेळेत लोहगाव विमानतळावर पोहचले़ परंतु, तांत्रिक कारणामुळे हे विमान रद्द करण्यात आले़ या विमानातून १७९ प्रवासी दिल्लीला जाणार होते़ परंतु, त्यांची कोणतीही सोय एअर एशियाने केली नाही की, त्यांना उशिरापर्यंत विमान रद्द झाल्याची माहिती दिली नाही़ जेव्हा काही प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा त्यातील काही जणांना ज्या विमानात जागा शिल्लक होती़ तेथे त्यांची सोय केली़ तरीही रात्री अकरा वाजेपर्यंत शंभरहून अधिक प्रवासी विमानतळावर तटकळत बसले होते़ त्यांची काय सोय करणार याची कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते़
एअर एशियाच्या मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ एअर एशियाच्या कस्टमर सर्व्हिस नंबरवर संपर्क साधला़ परंतु, त्यावर विमान रद्द झाल्याची कोणतीही माहिती दिली जात नव्हती़ हे विमान सायंकाळी ६ वाजता निघून रात्री ८़१५ मिनिटांनी दिल्लीला पोहचेल, अशी टेप रात्री साडेदहा वाजता ऐकविली जात होती़ त्यांचे सर्व एक्झीक्युटिर बिझी असल्याचे सांगितले जात होते़