पुरंदरमध्ये शिवतारेंच्या पक्ष व चिन्हाचा एअर बलून प्रचार; आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 17:24 IST2024-11-10T17:22:24+5:302024-11-10T17:24:08+5:30
एअर बलूनवर पक्षाच्या चिन्हासह विजय शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर देखील लिहिण्यात आला होता

पुरंदरमध्ये शिवतारेंच्या पक्ष व चिन्हाचा एअर बलून प्रचार; आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे: पुरंदर मतदारसंघात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हडपसर (फुरसुंगी) पोलिस ठाण्यात एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या पक्षाचे चिन्ह असलेला एअर बलून कोणतीही परवानगी न घेता रॉयल स्टे इन लॉजिंगच्या गच्चीवर बांधून आचारसंहितेचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अक्षय अरूण पवार असे आरोपीचे नाव असून, याप्रकरणी शेखर अमरदीप कांबळे (३८, रा. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
यासंबंधी अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी शुक्रवारी (दि. ८) जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रकारासंदर्भात तक्रार दिली केली होती. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. संबंधित एअर बलूनवर पक्षाच्या चिन्हासह विजय शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर देखील लिहिण्यात आला होता. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ देखील सुरवसे पाटील यांनी दिले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास याप्रकरणी अक्षय पवार याच्याविरोधात आदर्श आचारसंहिता भंग करून खासगी ठिकाणाच्या जागेचे विद्रुपीकरण आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम १३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे या करत आहेत.