शाळेच्या प्रांगणात बसविण्यात आले वायुसेनेचे विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 08:00 PM2019-03-03T20:00:30+5:302019-03-03T20:01:23+5:30
पुण्यातील संस्कृत विद्या- मंदिर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात वायुदलाचे जुने एचपीटी-32 हे विमान बसविले आहे.
पुणे : विद्यार्थ्यांना भारतीय वायुदलाचा इतिहास, त्याचा पराक्रम सदैव लक्षात रहावा, त्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी या उद्देशाने पुण्यातील संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात वायुदलाचे जुने एचपीटी-32 हे विमान बसविण्यात आले आहे. त्याचे अनावरण रविवारी निवृत्त एअर मार्शल भूषण गाेखले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गाेपाळ अवटी, निवृत्त विंग कमांडर आणि संस्थेचे अध्यक्ष विनायक डावरे, संस्थेचे प्रमुख विश्वस्त अशाेक जांभाेरकर, संस्थेच्या संस्थापिका-संचालिका तारा जांभाेरकर आदी मंचावर उपस्थित हाेते.
संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हे विमान एका लाेखंडी खांबावर उभे करण्यात आले असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संस्थेच्या प्रांगणात बसविण्यात आलेले एचपीटी -32 हे विमान वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत हाेते. गेल्या तीस वर्षांपासून हे विमान वायुदलाच्या सेवेत हाेते. या विमानाच्या अनावरण साेहळ्यात बाेलताना भूषण गाेखले यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. गाेखले म्हणाले, 62 च्या युद्धात आपला पराभव झाल्यानंतर मी आणि माझ्या भावाने भारतीय संरक्षण दलात जाण्याचा निर्णय घेतला. 71 च्या युद्धात मी आणि माझा भाऊ आम्ही दाेघेही सहभागी हाेताे. राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी मध्ये असताना मला माझ्या गुरुंनी एक मंत्र दिला हाेता की जे वर जातं ते खाली येतं, त्यामुळे आपले पाय नेहमी जमिनीवर राहायला हवेत. आज अभिनंदन हे एक महत्त्वाचे नाव आहे. प्रत्येकाला सैन्यात जाता आले नाही तरी प्रत्येकाने देशासाठी प्रामाणिकपणे आपले काम करायला हवे. भावी पिढीने ताठ मानेने जगायला हवे.
डावरे म्हणाले, या संस्थेच्या प्रांगणात वायुसेनेचे विमान असावे हे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. वायुसेनेच्या प्रत्येक पायलटच्या मागे या विमानातील प्रशिक्षण असते. विद्यार्थ्यांना मी वायुदलाच्या विविध विमानांची माहिती सुद्धा सांगितली त्यासाठी विशेष तास घेण्यात आला हाेता. त्यावेळी विद्यार्थी ज्या कुतुहलाने प्रश्न विचारत हाेते त्यावरुन भारतात माेठे जेट तयार करण्याचे कारखाने सुरु हाेण्यास वेळ लागणार नाही.