लोहगावमधील एअरफोर्सचे प्रतिबंध कमी करण्यासाठी प्रयत्न करणार : अनिल शिरोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:45 PM2018-03-27T12:45:29+5:302018-03-27T12:45:29+5:30
स्वमालकीच्या जमिनी असूनही काहीच करता येत नसून साधे झाडही लावण्यास सक्त मनाई आहे. ९०० मीटरचे प्रतिबंध कमी करण्याची मागणी हे शेतकरी अनेक वर्षे करत आहे.
विश्रांतवाडी : लोहगावमधील एअरफोर्स स्टेशन व एअरफोर्सच्या बॉम्बसाठ्यापासून असलेले प्रतिबंध ९०० मीटरवरून ३०० मीटरपर्यंत कमी आणण्यासाठी केंद्र शासनाकडे पूर्ण ताकदीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी दिले.
लोहगावमधील स्थानिक शेतकरी व नागरिकांनी भाजपचे पुणे शहर चिटणीस महेंद्र गलांडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दि. २६) शिरोळे यांची भेट घेऊन एअरफोर्स स्टेशनच्या निर्बंधामुळे निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर शिरोळे यांनी हे आश्वासन दिले. यावेळी लोहगावच्या नागरिकांच्या वतीने महेंद्र गलांडे यांच्यासमवेत लोहगावचे माजी उपसरपंच प्रितम खांदवे पाटील,सुनील खांदवे पाटील, प्रशांत खांदवे, विशाल खांदवे उपस्थित होते. एअरफोर्सच्या ९०० मीटर प्रतिबंधामुळे बाधित शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे. याठिकाणी स्वमालकीच्या जमिनी असूनही काहीच करता येत नसून साधे झाडही लावण्यास सक्त मनाई आहे. ९०० मिटरचे प्रतिबंध कमी करण्याची मागणी हे शेतकरी अनेक वर्षे करत आहेत, ही बाब शिरोळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
शिरोळे म्हणाले, की जर देशातील इतर एअरफोर्स स्टेशनचे प्रतिबंध ९०० वरुन ३०० मीटरपर्यंत कमी केले असतील तर लोहगावमध्येही हा नियम लागू झाला पाहिजे. आपण स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. जर त्यांच्यावर अन्यान्य झाला असेल, तर हा अन्याय दूर करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शिरोळे म्हणाले.