नववी, अकरावीसाठी हवा फाउंडेशन कोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:11 AM2021-04-12T04:11:08+5:302021-04-12T04:11:08+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील वर्गात प्रवेश देणे आणि अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे या स्वतंत्र बाबी आहेत. विद्यार्थ्याच्या काही मूलभूत संकल्पना त्या-त्या वर्गात स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स तयार करण्याची आवश्यकता आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद आहेत. परंतु, नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. तर अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू झाली. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अकरावीचा फारसा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. नववीमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमासाठी पूरक असणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीत जाण्यापूर्वी विज्ञान व वाणिज्य विषयातील काही संकल्पनांची माहिती होणे आवश्यक असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षण तज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख व डॉ. वसंत काळपांडे यांनी सांगितले.
--
राज्य शासनाने आपत्कालीन परिस्थितीत घेलेला निर्णय योग्य आहे. नववीत दहावीचा तर अकरावीत बारावीचा पाया भक्कम होता. त्यामुळे दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या विज्ञान, गणित आदी विषयातील संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने विविध संस्थांच्या सहकार्याने फाउंडेशन कोर्स तयार करावा. तसेच डिजिटल माध्यमातून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या मागे राहणार नाही.
- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
---
आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट न होणे हे विद्यार्थी हिताचे नाही. व्याकरणासह विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, भूगोल आदी विषयांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे. त्यामुळे विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ