एअर इंडिया, सुवर्णयुग संघ विजयी

By admin | Published: May 12, 2017 05:30 AM2017-05-12T05:30:44+5:302017-05-12T05:30:44+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित

Air India, Golden Age team won | एअर इंडिया, सुवर्णयुग संघ विजयी

एअर इंडिया, सुवर्णयुग संघ विजयी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत उद्घाटनाच्या दिवशी एअर इंडिया, सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात आपली विजयी घोडदौड सुरू केली.
महाराष्ट्र व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने बाबूराव सणस मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात अ गटात एअर इंडिया संघाने बॉम्बे पोर्ट ट्रस्ट संघावर ३४-१७ गुणांनी विजय मिळवित आपल्या नावाला साजेसा खेळ करीत पहिला दिवस गाजविला. मध्यंतराला एअर इंडिया संघाकडे १८-९ अशी आघाडी होती. एअर इंडियाच्या सिद्धार्थ देसाई व मनोज धूल यांनी चौफेर चढाया करीत मैदान दणाणून सोडले.
एअर इंडिया सामन्याच्या सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळविली होती. त्यांना विकास काळे याने केलेल्या पकडींची उत्कृष्ट साथ मिळाली. बाँम्बे पोर्ट ट्रस्टच्या शुभम कुंभार व शिवराज जाधव याने खोलवर चढाया करून विजयासाठी जिवाचे रान केले; मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दीपक गोरी याने त्यांना काही चांगल्या पकडी घेत मोलाची साथ देण्याचा प्रयत्न केला.
महिला विभागात यजमान सुवर्णयुग संघाने सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठानचा ५१-१४ असा धुव्वा उडवित घरच्या मैदानावर शानदार विजय मिळविला. मध्यंतराला सुवर्णयुग संघाकडे २३-५ अशी भक्कम आघाडी होती. सुवर्णयुग संघाची आंतराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफ व ईश्वरी कोंढाळकर यांनी उत्कृष्ट खेळ करीत आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्यांना कोमल जोरी व हर्षदा सोनवणे यांनी काही चांगल्या पकडी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठानच्या प्रियंका गरदास हिने चांगला प्रतिकार केला. तर प्रतीक्षा दाभाडे हिने चांगल्या पकडी केल्या.
तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यंवशी, माणिक सावंत, सुनील रासने, अनंता शेळके, राजेंद्र घोडके, उल्हास भट, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मधुकर नलावडे, सहकार्यवाह संदेश जाधव, शांताराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला सुवर्णयुग संघाची आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफ हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली.

Web Title: Air India, Golden Age team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.