राज्यात वायुप्रदुषणाचा विळखा; राज्यस्तरीय ‘टास्क फोर्स’ ची स्थापना, आराेग्य विभागाचा निर्णय
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 7, 2023 03:21 PM2023-11-07T15:21:26+5:302023-11-07T15:21:49+5:30
वायु गुणवत्ता निर्देशांक हा १०० च्या आत हवा ताे आता २०० च्या पुढे गेला
पुणे : पुण्या, मुंबईसह राज्यात वायुप्रदुषणाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे आराेग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, याबाबत आणखी अभ्यास करण्यासाठी आणि प्रदुषण कमी करणे, आराेग्य राखण्याबाबत राज्याच्या आराेग्य विभागाकडून ‘टास्क फाेर्स’ ची स्थापना करण्याचे निर्देश राज्याच्या आराेग्य आयुक्तांनी दिले आहेत.
राज्यातील शहरांमध्ये खासकरून मुंबई व पुण्यात वायुप्रदुषण हे धाेकादायक पातळीवर पाेचले आहे. वायु गुणवत्ता निर्देशांक हा १०० च्या आत हवा ताे आता २०० च्या पुढे गेला आहे. त्यामुळे श्वसनविषयक आजार असलेल्या नागरिकांना आराेग्यविषयक समस्या जसे खाेकला, दमा, श्वसनाचे विकार जाणवत आहेत. याचा सर्वगाधिक त्रास हा जाेखमीच्या लाेकांना जसे वयाेवृध्द, बीपी, डायबेटिस अशी सहव्याधी असलेले आणि लहान मुलांवर हाेत आहे. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते.
काेराेनाच्या काळात काेराेनाबाबत उपाययाेजना करण्यासाठी राज्यस्तरीच टास्क फाेर्सची स्थापना करण्यात आली हाेती. या टास्क् फाेर्स कडून विविध निर्देश देण्यात येत हाेते. याच धर्तीवर आता आराेग्य विभागाकडून वायुप्रदुषणाबाबत अभ्यास करण्यासाठी या टास्क फाेर्सची स्थापना करण्यात येईल, अशी माहीती राज्याच्या साथराेग विभागाचे सहसंचालक डाॅ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली.
या टास्क फाेर्समध्ये बीजे वैदयकीय महाविदयालयातील फुप्फुसराेग विभागाचे प्रमुख, पुणे महापालिकेच्या आराेग्य विभाग व पर्यावरण विभागाचे तज्ज्ञ, मुंबईतील पर्यावरण वा वैदयकीय तज्ज्ञ, साथराेग विभागातील अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
एन ९५ मास्क राेखू शकताे प्रदुषित हवा
आराेग्य विभागाच्या मते एन ९५ मास्क प्रदुषित हवेतील पीएम १० आणि पीएम २.५ हे सुक्ष्म धुलिकण श्वासातून फुप्फुसांत जाण्यापासून राेखू शकताे. ताे साधा कापडी मास्क किंवा सर्जिकल मास्क राेखू शकत नाही. म्हणून हा मास्क आठ तासांसाठी संरक्षण देउ शकत असल्याने ताे निदान जाेखमीच्या लाेकांनी वापरल्यास याेग्य ठरेल.
वायुप्रदुषण वाढल्यामुळे राज्यस्तरीय टास्क फाेर्सची स्थापना आठवडाभरात करण्यात येणार आहे. या टास्क फाेर्सच्या प्रतिनिधींकडून वायु प्रदुषण कमी करणे आणि त्याचबराेबर आराेग्यविषयक काय काळजी घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येतील. - डाॅ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, साथराेग विभाग, पुणे