लढाऊ विमानाचा टायर फुटल्याने पुण्यात विमान वाहतुक कोलमडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:35 PM2019-03-18T16:35:08+5:302019-03-18T16:36:40+5:30
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा धावपट्टीवर टायर फुटल्याने सोमवारी लोहगाव विमानतळावरील विमान वाहतुक कोलमडून गेली. सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ यादरम्यान विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही.
पुणे : भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा धावपट्टीवर टायर फुटल्याने सोमवारी लोहगावविमानतळावरील विमान वाहतुक कोलमडून गेली. सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ यादरम्यान विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही. त्यामुळे बहुतेक विमानांना उड्डाणासाठी विलंब झाला. तसेच बाहेरून येणारी काही विमाने अन्यत्र वळविण्यात आली.
लोहगावविमानतळ हे हवाई दलाचे असल्याने सकाळच्या वेळेत धावपट्टीवरून सरावासाठी लढाऊ विमानांचे उड्डाण होते. सकाळी ११ वाजता नागरी विमान सेवा सुरू केली जाते. पण नेमक्या त्याच वेळेत हवाई दलाच्या सुखोई या लढाऊ विमानाचा टायर धावपट्टीवर उतरताना फुटला. ‘सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे इतर विमानांची ये-जा पुर्णपणे थांबली. धावपट्टीवरून हे विमान बाजूला करण्यासाठी जवळपास अडीच तासांचा कालावधी लागला’, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी दिली.
त्यामुळे या वेळेत विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही. त्यानंतर हळूहळू विमाने मार्गस्थ झाली. बहुतेक विमानांना उड्डाणासाठी २ ते ३ तासांचा विलंब लागला. तसेच बेंगलुरू-पुणे हे विमान हैद्राबादला तर दिल्ली-पुणे हे विमान मुंबईकडे वळविण्यात आले. इतर शहरांमधून येणाºया विमान उड्डाणेही विलंबाने येऊ लागली. या खोळंब्यामुळे शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.