आगामी काळात विमान प्रवास होणार स्वस्त : एव्हिएशन क्षेत्रात वाढतायेत करिअरच्या संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 03:10 PM2019-08-19T15:10:34+5:302019-08-19T15:17:34+5:30
देशात सध्या विविध कंपन्यांकडे एकूण १ हजार ५८ विमाने असून त्यात वाढ करावी लागेल.
पुणे : एव्हिएशन क्षेत्रात दरवर्षी १६ ते १७ टक्क्यांनी गुंतवणुक वाढत चालली असून विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या आणि विमानतळावरून उडणाऱ्या विमानांच्या संख्येही वाढ होत आहे. त्यामुळे एव्हिएशन क्षेत्रातील करिअरच्या संधी वाढत चालल्या आहेत. केंद्र शासनानेही या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिल्यामुळे पुढील काळात विमान प्रवास अधिक स्वस्त झालेला दिसून येईल,असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
‘नॅशनल एव्हिएशन डे’ १९३९ पासून साजरा केला जातो.मात्र,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी नागरी हवाई सेवेचे उद्गाते ऑरवेल राईट यांचा १९ ऑगस्ट हा जन्म दिन ‘नॅशनल एव्हिएशन डे’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.नासाकडूनही ‘एव्हिएशन डे’साजरा केला जातो. विकसित व विकसनशील राष्ट्रांमध्ये विमान सेवेचा अधिक जलद गतीने विकास होत आहे.केंद्र शासनाने विविध शहरे विमानतळांच्या माध्यमातून जोडण्याबाबत पुढाकार घेतला आहे.त्यामुळे देशातील एव्हिएशन क्षेत्राला गती मिळाली आहे.या क्षेत्रातील करिअरच्या संधी ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१३ पासून विद्यापीठात एम.टेक.एव्हिएशन अभ्यासक्रम सुरू केला.तर चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात २० विद्यार्थ्यांना बी.टेक.एव्हिएशन अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.अदित्य अभ्यंकर म्हणाले,एव्हिएशन क्षेत्रातील गुंतवणुक दिवसेंदिवस वाढ आहे.त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. भारतातील ९ ते १० नामांकित विमान कंपन्यांकडून चांगली विमान सेवा दिली जात असून देशभरात सुमारे ६० ते ७० नवीन विमानतळ तयार होत आहेत.तसेच देशात सध्या विविध कंपन्यांकडे एकूण १ हजार ५८ विमाने असून त्यात वाढ करावी लागेल.परिणामी या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.त्यामुळेच विद्यापीठाने यंदा बी.टेक.एव्हिएशन हा अभ्यासक्रम सुरू केला. विद्यापीठाकडून केवळ पायलट तयार केले जात नाहीत.तर एव्हिएशन क्षेत्रात नवनवीन संशोधन व्हावे,यासाठी संशोधक विद्यार्थी घडविण्याचे कामही विद्यापीठाकडून सुरू आहे.
गेल्या काही वर्षात किंगफिशर ,जेट एअरवेज विमान कंपन्या बंद पडल्या.त्यामुळे विमान क्षेत्रात मंदी असल्याचे बोलले जाते.प्रत्यक्षात एव्हिएशन क्षेत्रात कोणत्याही प्रकारची मंदी नाही.बंद पडलेल्या कंपन्यांचे व्यवस्थापन चांगले नव्हते.त्यामुळे केवळ व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांमुळे या कंपन्या बंद पडल्या.या उलट इंडिगो कंपनीने अधिक चांगली सेवा देण्यासाठी काही बदल केल्याचे दिसून येत आहे.काही प्रमाणात अडचणीत सापडलेली स्पाईस जेट कंपनीसुध्दा आता रूळवर आली आहे,असेही अभ्यंकर म्हणाले.
...
एक नवीन विमान खरेदी केल्यानंतर एका पायलटमागे १५ कर्मचारी नियुक्त करावे लागलात. तर एका महिन्याला या एका विमानासाठी ८०० कर्मचारी लागतात. देशात सुमारे ४५७ विमानतळ होते. त्यात वाढ होत चालली असून पुण्याजवळच पुरंदर व पनवेल येथे दोन नवीन विमानतळ होणार आहे. या क्षेत्रात प्रतिष्ठा असली तरी कठोर परिश्रम घेण्याची आणि मनापासून काम करण्याची इच्छा असणे गरजेचे आहे. वैमानिकांची शारीरिक सुदृढता हा सुध्दा महत्त्वाचा घटक आहे. वैमानिक आणि हवाई सुंदरी या व्यतिरिक्त इतरही कर्मचाऱ्यांची एव्हिएशन क्षेत्रात आवश्यकता आहे.
- डॉ. आदित्य अभ्यंकर, तंत्रज्ञान, विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ