‘वर्क ऑर्डर’ सहीसाठी विमानाने राजस्थानला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 01:47 AM2018-12-08T01:47:45+5:302018-12-08T01:48:09+5:30
शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत तातडीने २५ ई-बस खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली ‘वर्क ऑर्डर’ देण्याची घाई सत्ताधारी भाजपाने केली.
पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत तातडीने २५ ई-बस खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली ‘वर्क ऑर्डर’ देण्याची घाई सत्ताधारी भाजपाने केली. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची सही घेण्यासाठी वर्क ऑर्डरची प्रत थेट विमानाने राजस्थानला पाठविण्यात आली. काही तासांत या वर्क आॅर्डरवर सही होऊन अखेर गुरुवारी (दि. ६) २५ ई-बस खरेदीची वर्क ऑर्डरदेखील देण्यात आली. सत्ताधारी भाजपाने एवढी घाई नक्की कशासाठी केली, असा सवाल काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला आहे.
शहरासाठी पहिल्या टप्प्यात २५ ई-बस खरेदी करण्यासाठी गुरुवारी (दि.६) संबंधित कंपनीला वर्क आॅर्डर देण्यात आली. यासाठी वर्क आॅर्डरवर गुंडे यांची सही घेणे आवश्यक होते. परंतु गुंडे सध्या राज्यस्थान येथे निवडणुकीच्या ड्युटीवर आहेत. बुधवारी संबंधित खाजगी कंपनीचा कर्मचारी आणि पीएमपीएमएलचा अधिकारी थेट विमानाने वर्क ऑर्डर घेऊन राज्यस्थानला गेले व सही घेतली, असे शिंदे यांनी सांगितले.
>महागड्या दराने बस खरेदी
पर्यावरणपूरक म्हणून तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या ई-बस खरेदी करण्यात येत आहेत. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बससाठी चायनीज कंपनीला एका बससाठी तब्बल ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. सध्या शहरात सुरू पर्यावरणपूरक सीएनसी बस केवळ ३५ लाखांत येत असताना महागड्या बस भाड्याने घेतल्या आहेत. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या पीएमपीएलमल गाळात घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.