विमानतळ सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 08:56 PM2018-05-10T20:56:42+5:302018-05-10T20:56:42+5:30
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पुणे: राज्य शासनाकडून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्यात आली असली तरी विमानतळाच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिध्द केल्या झाल्यानंतरच विमानतळासाठी लागणा-या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू होईल,असे जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभागातील अधिका-यांनी सांगितले.
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातही जमीन भूसंपादनास अंदाजे २ हजार २७१ कोटी आणि फळझाडे, विहिरी,ताली आदीसाठी अंदाजे ८०० कोटी रुपयांचा मोबदला शेतक-यांना द्यावा लागू शकतो. मात्र, कोणत्या गावातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार असून त्यासाठी किती खर्च येईल याची अचूक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तसेच विमानतळाच्या सीमारेषाही अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.
विमानतळासाठी संपादित केल्या जाणा-या जमिनीमुळे एकही गावठाण बाधित होणार नाही; याची काळजी घेतली जाणार असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते. त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव,खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाची वाडी या सात गावांतील कोणत्या गट क्रमांकातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार याबाबतची माहिती घेण्याची प्रक्रिया स्पेशल प्लॅनिंग अॅथेरोटीकडून सुरू आहे. जमिनीसंदर्भातील अचूक माहिती प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिध्द होईल. त्यामुळे शासनाकडून भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात भूसंपादन सुरू करण्यास अजून काही कालावधी थांबावे लागणार आहे.