खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:46+5:302021-01-25T04:10:46+5:30
राजगुरुनगर: खेड व चाकण येथील औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी खेड तालुक्यात विमानतळ व्हावे, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते ...
राजगुरुनगर: खेड व चाकण येथील औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी खेड तालुक्यात विमानतळ व्हावे, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली. तसा प्रस्ताव राज्यशासनाकडे दाखल केला असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील २७ गावातील तसेच जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे यांच्या गटातील ६ भजनी मंडळांना आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते खेड पंचायत समितीच्या आवारात साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मोहिते म्हणाले, पुर्वी नियोजित असलेला खेड तालुक्यातील विमानतळ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने रद्द झाला. पुरंदर तालुक्यात हे विमानतळ होणार आहे. पुरंदर तालुक्यात मोठे आंदोलन होऊन विमानतळाला तीव्र विरोध झाला. आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे. बर्फाळ प्रदेशात देखील विमानतळ होत आहेत. तांत्रिक अडचणीचे कारण बाजुला करून हा प्रकल्प पुन्हा खेड तालुक्याच्या पुर्व भागात नव्याने सुरु व्हावा, अशी खेड तालुक्यातील जनतेची मागणी आहे. तालुक्यात विमानतळाला पुर्वी होणारा विरोध मावळला आहे. विमानतळ झाले तर खेड तालुक्याचा कायापालट होणार आहे. यामुळे विमानतळ खेडला व्हावे अशी अपेक्षा मोहिते यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, माजी सदस्य अरुण चांभारे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर,माजी सभापती, अंकुश राक्षे, अरुण चौधरी, शांताराम चव्हाण, सुखदेव पानसरे, कैलास सांडभोर, प्रताप ढमाले, संतोष गव्हाणे, अजय भागवत,
सुभाष होले, गटविकास अधिकारी अजय जोशी मनिषा पवळे,अरुण मुळुक आदी उपस्थित होते.