खेड तालुक्यातच होणार विमानतळ!
By admin | Published: October 6, 2016 03:51 AM2016-10-06T03:51:07+5:302016-10-06T03:51:07+5:30
खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक
पिंपरी : खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक, तसेच स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, औद्योगिकीकरणाच्या दृष्टिकोनातून व शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
खेड तालुक्यात होणाऱ्या नियोजित विमानतळाचे स्थलांतर पुरंदर तालुक्यात होणार, असे निश्चित करण्यात आले होते. त्याचा फटका उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी औद्योगिक क्षेत्राला बसणार होता. याबाबत आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. लांडगे म्हणाले, ‘‘खेड-चाकण परिसरात विमानतळ होणार, म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून उद्योग उभारले आहेत. या औद्योगिक पट्ट्यात पंधरा हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनीही मोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार होता. उद्योगक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रस्तावित विमानतळाचे स्थलांतर करू नये, अशी मागणी केली होती. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे तांत्रिक पथक आता खेड परिसरातील राजगुरुनगर येथील क्षेत्राचा प्राथमिक स्तरावर अभ्यास करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बाजू समजून घेतली आहे. खेडमध्येच विमानतळ उभारण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत.’’