सौर उर्जेने उजाळणार विमानतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:58 PM2018-04-10T19:58:15+5:302018-04-10T19:58:15+5:30
लोहगाव विमानतळ सौर उर्जा प्रकल्प उभारणारे देशातील चौथे विमानतळ आहे.
पुणे : लोहगाव विमानतळ पुढील महिन्यापासून सौरउर्जेने उजळून निघणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ३०० किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यातून विमानतळावरील प्रकाश व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा तसेच अन्य काही दैनंदिन वीजवापराच्या उपकरणांना ही वीज मिळणार आहे.
मागील काही महिन्यांपासून लोहगाव विमानतळावर अनेक सुधारणा केल्या जात आहे. विमानतळावरील बैठक व्यवस्थेत वाढ, स्वच्छतागृहांचे नुतनीकरण, सुरक्षाव्यवस्था, पार्किंग अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामध्ये आता सौरउर्जा प्रकल्पाची भर पडणार आहे. विमानतळावर ३०० किलोवॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सध्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दि. २० एप्रिलपर्यंत हे काम पुर्ण होण्याची शक्यता असल्याचे संचालक अजय कुमार यांनी सांगितले. देशात कोची, बेंगलोर व चेन्नई येथील विमानतळांवरच सध्या असा प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळ सौर उर्जा प्रकल्प उभारणारे देशातील चौथे विमानतळ ठरणार आहे.
सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रामुख्याने विमानतळावरील प्रकाश व्यवस्थेसाठी याचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही व अन्य काही उपकरणांसाठी सौरउर्जेचा वापर होईल. त्यामुळे विमानतळ प्रशासनाचे वीजवापरासाठी दरवर्षी खर्च होणारे लाखो रुपये वाचणार आहेत. तसेच वीजेचीही बचत होणार असून त्याचा अन्य कारणांसाठी वापर करता येईल.
.............................
या प्रकल्पामुळे विमानतळ वीज वापराबाबत काही प्रमाणात स्वयंपुर्ण होणार आहे.विमानतळावर ३०० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. पण त्यापुर्वी २० तारखेपर्यंत प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
- अजय कुमार, संचालक , लोहगाव विमानतळ