विमानतळाला इंचभरही जागा देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:52+5:302021-02-23T04:15:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : पुरंदर तालुक्यातील पारगाव व सात गावांनी परत एकदा एकजूट दाखवत विमानतळाला विरोध करण्यासाठी रविवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील पारगाव व सात गावांनी परत एकदा एकजूट दाखवत विमानतळाला विरोध करण्यासाठी रविवारी वनपुरी येथे बैठक घेत विमानतळाला विरोध करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी नुकतेच पुरंदर तालुक्यात होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ इतरत्र हलवू नये. नियोजित जागेवरच विमानतळ व्हावे, शक्यतो पारगाव हे गाव वगळून तेथेच विमानतळ करावे, अशी मागणी केली होती. पारगाव व सात गावांतून विमानतळाला तीव्र विरोध होत असल्याने शासकीय पातळीवरून विमानतळाची जागा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र माजी मंत्री शिवतारेंनी पुन्हा हा विषय उकरून काढत पारगाव वगळून नियोजित जागेवरच विमानतळ व्हावे, अशा मागणीचे पत्र खासदार शरद पवार यांना पत्र पाठवून केली आहे. यामुळे पारगाव, खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाची वाडी, मुंजवडी, एखतपूर येथील आजी माजी पदाधिकारी व विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे जितेंद्र मेमाणे, संतोष हगवणे, अमोल कामठे, रामदास होले, देविदास कामठे, पारगावच्या सरपंच प्रियांका मेमाणे, चंद्रशेखर मेमाणे, विजय गांजुरे आदींची वनपुरी येथील भैरवनाथ मंदिरात आज बैठक झाली.
बैठकीत माजी मंत्री पारगाव वगळून विमानतळ करा असे वक्तव्य करून या सात गावात फूट पाडू इच्छित आहेत. मात्र, आपण सात गावे नसून साथ साथ आहोत. आपल्या एकजुटीत फूट पाडण्याचा कुटील डाव आपण हाणून पाडला पाहिजे. आता गाफील न राहता आपली वज्रमूठ दाखवून देऊ पुन्हा नव्या जोमाने सात ही गावांनी एकजुटीने विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
चौकट
या सात गावांतून शासनाकडून ग्रामसभांना परवानगी मिळेपर्यंत ग्रामपंचायतींनी मासिक सभेतून विमानतळाला विरोधाचे ठराव घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमच्या बागायती जमिनीवर विमानतळ उभारण्याचा विचार डोक्यातून काढून टाका, कोट्यवधी रुपये मोजले तरीही कोणीही आपली इंचभर जमीन देणार नाही. संघर्षासाठी आम्हीही तयार आहोत. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. आमच्या जमिनी आम्ही देणार नाही त्याला आमचा कायम विरोध राहणार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
फोटो मेल केला आहे