'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:12 IST2024-05-29T16:08:08+5:302024-05-29T16:12:50+5:30
तावरेच्या सांगण्यावरून हळनोरने रक्ताचे नमुने बदलले, तर घटकांबळेमार्फत ३ लाखांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले

'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित
पुणे : कल्याणी नगर अपघात प्रकरणात लाच स्वीकारून अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणि रक्ताचा बनावट अहवाल तयार केल्याप्रकरणी ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. या तिघांना ससून रुग्णालयातून निलंबित करण्यात आले आहे. आरोपींचे निलंबन झाल्याचे खुद्द ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी जाहीर केलं
कल्याणी नगर येथे एका अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवर निघालेल्या तरुण-तरुणीला उडवल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर त्याच्या वडिलांनी व आजोबांनी मिळून पोलिस, पोर्शे कारचा चालक, ससून रुग्णालयातील डॉक्टर यांना मॅनेज केले. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नऊच्या सुमारास बाळाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. अजय तावरे, डॉ. हाळनोर यांनी मुलाच्या रक्तात अल्कहोल आढळलेच नसल्याचे म्हटले होते. मात्र, या प्रकरणात काही काळेबेरे होण्याची शक्यता आणि संशय पाहता पोलिसांनी गुपचूप दुसऱ्यांदा मुलाचा रक्ताचा नमुना घेतला होता. तसेच मुलाच्या वडिलांचे रक्ताचे नमुने घेऊन तिन्हीही नमुन्यांची डीएनए टेस्ट करण्यास सांगितली होती. त्यातील दोन ससून रुग्णालयातील डीएनए आणि मुलाच्या वडिलांचे डीएनए मॅच झाले नाही. मात्र, दुसरा अहवाल मुलाच्या वडिलांच्या डीएनएशी मॅच झाला. ससून रुग्णालयातून प्रकरण मॅनेज केल्याचा संशय खरा ठरला आणि पोलिसांच्या तपासात फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यांचा यात रोल असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.
'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
डॉ. श्रीहरी हाळनाेर याने ३ लाख रुपये घटकांबळेमार्फत स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. तर, या सर्व प्रकरणाचा ससूनमधील अहवालात फेरफार करण्यातील मास्टर माइंड डॉ. तावरे असल्याचे निष्पन्न झाले. तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.