Hadapsar Vidhan Sabha: हडपसरमध्ये अजित पवार गट; प्रमोद नाना भानगिरेंचा पत्ता कट; चेतन तुपेंना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:08 PM2024-10-23T14:08:10+5:302024-10-23T14:09:14+5:30
भानगिरेंच्या उमेदवारीसाठी हडपसरमधून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पुणे ते मुंबई पायी वारी केली होती
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही पहिली उमेदवार यादी जाहीर करत ३८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याची माहिती देण्यात आली असून राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवार यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
पुण्यात हडपसरमध्ये जागावाटप आणि उमेदवारीवरून सस्पेन्स कायम होता. मात्र हडपसरमधून चेतन तुपे यांना उमेदवारी देऊन जागावाटप आणि उमेदवारीच्या चर्चेला अजित पवार गटाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातून महायुतीतून अजित पवार गटाला उमेदवारी मिळणार असल्याचे सूत्रांकडून कळले होते. अशातच एकनाथ शिंदे गटाचे प्रमोद नाना भानगिरे यांनीसुद्धा हडपसर मधून उमेदवारी मागितली होती. आता महायुतीकडून तुपेंना उमेदवारी देऊन भानगिरेंचा पत्ता कट केला आहे.
हडपसरमधून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत प्रमोद नाना भानगिरे यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. त्यांनी मुखमंत्र्यांना भेटण्यासाठी पुणे ते मुंबई पायी वारीही केली होती. पुण्यातील हडपसर विधानसभेत शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण आहे. नाना याठिकाणी नक्की निवडून येतील. ते हडपसरचा विकासही करतील असंही ते म्हणाले होते. अखेर तुपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वडगाव शेरीचा सस्पेन्स कायम
वडगाव शेरीमधून महायुतीत रस्सीखेच असल्याचे दिसून आले आहे. भाजपकडून जगदीश मुळीक यांनी उमेदवारी मागितली आहे. पण हि जागा अजित पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चा असल्याने सुनील टिंगरेंना तिकीट मिळण्याचे चान्सेस वाढले आहे. तरीही अजित पवार गटाची यादी जाहीर होईपर्यंत हा सस्पेन्स कायम राहणार आहे.