अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 10:56 AM2023-11-10T10:56:04+5:302023-11-10T10:57:55+5:30
मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. खासदार शरद पवार आज पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानी आहेत, या ठिकाणी अनेक नेत्यांनी पवार यांना भेटण्यासाठी गर्दी केली आहे.
वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू, ९ जखमी; भाजप नेत्याला मारण्याचा प्रयत्न?
गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसत आहे, या नेत्यांमध्ये दिलीप वळसे पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, वळसे पाटील यांना सहकार खातं मिळालं आहे. दिलीप वळसे पाटील हे अगोदर खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पण, त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जात मंत्रिपदाची शपथ घेतली.
काल राष्ट्रवादी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. तर दुसरीकडे आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, याचे निकालही समोर आले. या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायती शरद पवार गटाने जिंकल्या आहेत, ही देखील पार्श्वभूमी या भेटीला आहे. यामुळे राजकीय चर्चाही जोरदार सुरू आहेत.