अजित पवारांनी घेतली अमेनिटी स्पेसची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:12+5:302021-08-21T04:16:12+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेतील माजी पदाधिकारी ...
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेतील माजी पदाधिकारी यांची शुक्रवारी बैठक घेतली. यामध्ये सध्या चर्चत असलेल्या अमेनिटी स्पेसच्या विषयाची माहिती घेतली.
दरम्यान महापालिकेतील विविध कामांची माहिती घेतानाच पवार यांनी, स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाच्या विस्ताराबाबत पाठिंब्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही पवार यांनी सांगितले. तर नदी सुशोभीकरण विषयात सर्व अभ्यास करूनच पुढील भूमिका मांडावी. विकास कामाच्या आड आपण येऊ नये. जेथे चूक असली तेथे आवश्य विरोध करावा, पण हे करताना पुणे शहराचे हित पाहिले पाहावे असेही ते म्हणाले.
शुक्रवारी सायंकाळी येथील सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या या बैठकीस आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे यांच्यासह प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, विशाल तांबे तसेच आदी नगरसेवक व माजी पदाधिकारी उपस्थित होते.
रुसवे फुगवे नको
पक्षातील नवीन शहर पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांकडून आलेली यादी पाहून पुढील आठ दिवसांत नवीन नियुक्त्या जाहीर केल्या जातील. शहराध्यक्ष नवीन असल्याने त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. आपापसातील रुसवे फुगवे दूर सारून सर्वांनी एक दिलाने काम करावे, अशा सूचनाही यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना केल्या.