‘ॲमेनिटी स्पेस’बद्दल अजितदादांचाच निर्णय अजून नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:26+5:302021-08-28T04:16:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “एखादा निर्णय लोकांच्या हिताचा असेल, शहराचा फायद्याचा आणि पारदर्शक असेल तर माझा नेहमी पाठिंबाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “एखादा निर्णय लोकांच्या हिताचा असेल, शहराचा फायद्याचा आणि पारदर्शक असेल तर माझा नेहमी पाठिंबाच असतो,” असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या ॲॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या प्रयत्नांबद्दलचा संभ्रम कायम ठेवला.
याच मुद्यावरून महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोनदा पलटी खाल्ली आहे. ॲॅमेनिटी स्पेस भाड्याने द्यायच्या की नाही यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या विधानाला महत्त्व आले आहे. पवार यांनीही या निर्णयाला थेट विरोध किंवा पाठिंबा न दर्शवता मोघम विधान केले आहे. मात्र या संदर्भात येत्या रविवारी निर्णय घेणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. कोरोना साप्ताहिक आढावा बैठकीनंतर ते शुक्रवारी (दि.२७) पत्रकारांशी बोलत होते.
नागरी सुविधांसाठी आरक्षित भूखंड तीस वर्षांच्या भाडेतत्त्वावर देऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शहराचा विकास करावयाचा या महापालिकेतील भाजपच्या प्रस्तावाबाबत सध्या सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे. या प्रस्तावाला बुधवारी महापालिकेतील राष्ट्रवादीने सशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर एका रात्रीत या निर्णयापासून घुमजाव केले. याबद्दल पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्याचा माझा कायम मानस असतो. विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण कधीच केले जात नाही.
“या संदर्भात पुणे मी रविवारी सकाळी ११ ते १ या वेळेत पक्षातील नगरसेवक, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहे. या बैठकीपूर्वी पुणे महानगर नियोजन समितीने तयार केलेल्या विकास आराखड्याचे प्रात्यक्षिक अधिकारी वर्गाकडून दाखविण्यात येणार आहे. निर्णय घेताना नागरिकांचे हित बघितले जाईल, नगरसेवकांचे पाहिले जाणार नाही,” असे पवारांनी स्पष्ट केले.