भीमा व मुळा-मुठा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे अजित पवार यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:01+5:302021-04-04T04:10:01+5:30
यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दरवर्षी उन्हाळ्यात ...
यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दरवर्षी उन्हाळ्यात जलपर्णीच्या वाढत्या प्रादुर्भावाने नदीकाठचे नागरिक त्रस्त आहेत. जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडतो. नदीतील जलजीवांवर विपरित परिणाम होतो. तसेच डासांची प्रचंड पैदास होऊन नदीकाठच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. ही बाब अजित पवार व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली .दोन्ही महानगरपालिकांद्वारे दौंड तालुक्यातील ठिकठिकाणी नदीपात्रात असलेली जलपर्णी काढण्यात यावी, व याबाबत कायमस्वरूपी उपाययोजनासंदर्भात कार्यवाहीची रूपरेषा ठरवावी अशी मागणी केली.त्यानंतर अजित पवार यांनी कार्यवाहीची रूपरेषा ठरवून संबंधित जलपर्णी तत्काळ काढून घ्याव्यात असे आदेश दिले. या बैठकीसाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,विभागीय आयुक्त सौरभ राव , जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुण्याचे आयुक्त विक्रमकुमार , प्रदूषण नियामक मंडळ चे नितिन शिंदे आदी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे येथे भीमा व मुळा मुठा नदी जलपर्णी संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठकीत उपस्थित मान्यवर.