अजित पवारांकडून ‘त्या’ दोघांची खरडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:01+5:302021-09-04T04:15:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील ११ गावांच्या मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पासह, सुरक्षारक्षक भरतीच्या वादग्रस्त निविदांना पाठिंबा देणाऱ्या स्थायी समितीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील ११ गावांच्या मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पासह, सुरक्षारक्षक भरतीच्या वादग्रस्त निविदांना पाठिंबा देणाऱ्या स्थायी समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘त्या’ सदस्यांची अजित पवार यांनी सर्वांसमोरच चांगलीच खरडपट्टी काढली. तुमच्या अशा वागण्याने पक्षाची बदनामी होत आहे, येथून पुढे असे वागणे खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम पवार यांनी यावेळी दिला.
कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोरच पवार यांनी उपस्थित स्थायी समिती सदस्या नंदा लोणकर व बंडू गायकवाड यांची झाडाझडती घेतली.
“शहराध्यक्षांनी, विरोधी पक्षनेत्यांनी त्या विषयांना विरोध करायचा आहे, अशा सूचना तुम्हाला दिल्या असताना तुम्ही पाठिंबा का दिला? तुम्ही जे केले ते अत्यंत चुकीचे असून, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही़ चूक ते चूक आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. तुमची भूमिका जर पक्षापेक्षा वेगळी होती तर त्याला त्याचवेळी विरोध का केला नाही? पुणेकरांच्या हिताचे प्रश्न असतील तेथे विरोध करू नका, पण चुकीच्या विषय खपवून घेणार नाही,” असे पवार यांनी सुनावले़
दरम्यान यावेळी लोणकर व गायकवाड यांनी पवार यांची जाहीर माफी मागितली. स्थायी समितीच्या बैठकीत घाईगडबडीत हे विषय पुकारले गेल्याने ते आमच्या लक्षात आले नाहीत, असा खुलासा या दोघांनी केला. येथून पुढे आम्ही जागरूकतेने स्थायी समितीच्या बैठकीत काम करू. ज्या दिवशी बैठक असेल त्यादिवशी सकाळी दहालाच महापालिकेत येऊ व पक्षाचे आदेश मानू, या शब्दात त्यांनी पवार यांना आश्वस्त केले.