अक्षय तृतीयेला आंबा खाणार ‘भाव’
By Admin | Published: April 20, 2015 04:30 AM2015-04-20T04:30:51+5:302015-04-20T04:30:51+5:30
या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबा महाग असेल, हा अंदाज खरा ठरला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आंबा थोडा स्वस्त झाला असला तरी
पुणे : या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबा महाग असेल, हा अंदाज खरा ठरला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आंबा थोडा स्वस्त झाला असला तरी मागील वर्षी अक्षय तृतीयेला लाभलेल्या दरापेक्षा यंदा पुणेकरांना जास्त पैसे मोजावे लागतील.
भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशी महती असलेल्या अक्षय तृतीयेकरिता आंबा घेण्यासाठी ग्राहकांनी रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डात बऱ्यापैकी गर्दी केली होती. अक्षय तृतीयेच्या (दि. २१) दिवशी रत्नागिरी हापूसला प्रतिडझन ३०० ते ८०० रुपयांपर्यंत दर राहील, असे आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. मागील वर्षी अक्षय तृतीयेला हा दर २०० ते ५०० रुपये इतका होता.
मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात तयार हापूसच्या दरामध्ये सुमारे ५०० रुपये घट झाली. सध्या तयार हापूसच्या ४ ते ८ डझनाच्या पेटीस २००० ते ४००० रुपये दर आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात तयार आंबा जास्त प्रमाणात विक्रीसाठी आला आहे. कर्नाटक आणि रत्नागिरीमधील सर्व प्रकारचा आंबा मिळून रविवारी बाजारात १४ ते १५ हजार पेट्यांची आवक झाली.