आळंदीला दररोज दोन लाख लिटर शुद्ध पाणी

By admin | Published: May 11, 2017 04:23 AM2017-05-11T04:23:09+5:302017-05-11T04:23:09+5:30

तीर्थक्षेत्र आळंदीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

Alandi consumes two lakh liters of clean water every day | आळंदीला दररोज दोन लाख लिटर शुद्ध पाणी

आळंदीला दररोज दोन लाख लिटर शुद्ध पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील दोन-तीन दिवसांपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे आळंदीकरांची शुद्ध पाण्याची दीर्घ प्रतीक्षा अखेर मार्गी लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आळंदी शहरात पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा केला जात होता. वास्तविक पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती आणि महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रसायन, तसेच मैलामिश्रीत पाणी थेट इंद्रायणीत सोडले जात असल्यामुळे नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत होते. हेच दूषित पाणी पुढे प्रवाहित होऊन आळंदीतील बंधाऱ्यामध्ये येते. नगर परिषद जलशुद्धीकरण केंद्रामार्फत या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी आळंदीकरांना पिण्यासाठी पुरवठा करते. मात्र, येथील पाणी प्रक्रिया प्रकल्प सदोष असल्यामुळे हे पाणी स्वच्छ होण्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आळंदीकर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली होती.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची मागणी आळंदी नगर परिषदेने लेखी पत्राद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आळंदीतील नदीतील पाण्याची, तसेच जलवाहिन्यांची पाहणी करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, या निर्णयासाठी बुधवारी (दि. १०) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी
आवश्यक असलेल्या पाणीसाठ्याव्यतिरिक्त शिल्लक कोट्यातून महापालिका आळंदीला पिण्यासाठी चऱ्होली जलवाहिनीद्वारे दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, शहर सहअभियंता रवींद्र दुधेकर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Alandi consumes two lakh liters of clean water every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.