आळंदीत इंद्रायणीला जलपर्णीचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 02:16 AM2018-05-06T02:16:05+5:302018-05-06T02:16:05+5:30
आळंदी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे.
आळंदी : येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे. जलपर्णीच्या आच्छादनामुळे जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ही जलपर्णी काढून कायमस्वरूपी उपायजोना करण्याची मागणी होत आहे.
नदीतील पाण्याला हिरवट रंग आणि दुर्गंधीयुक्त वासाने नदीचे पाणी आता वापरास अयोग्य झाले आहे. इंद्रायणी नदीत प्रचंड जलपर्णी फोफावली असून, ती आता फुलावर आली आहे. दिवसेंदिवस तिची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इंद्रायणीला लागलेले जलपर्णीचे हे ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न येथे येणारे भाविक विचारत आहेत.
या संदर्भात आळंदी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सागर भोसले म्हणाले, की नदीतील जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात येणार आहे. तसेच, आता नदीत पाणी सोडले असल्याने पाण्याची पातळीदेखील वाढेल. पाण्याचा प्रवाह वाहता राहणार असल्याने रंग आणि वास असलेले पाणी पुढे प्रवाहात वाहून जाईल. यामुळे आळंदीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटणार आहे. येत्या ४ दिवसांत आळंदीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे भोसले यांनी सांगितले.
पाणीपुरवठा केंद्राच्या पाणी साठवण बंधाऱ्यात जलपर्णी राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. नदीपात्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जलपर्णी वाहत येऊन आळंदी पाणीपुरवठा केंद्राच्या बंधाºयात येऊ नये, यासाठी प्लॅस्टिक ड्रम वायर रोपच्या साह्याने जलपर्णी थोपविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठा केंद्रातील पाण्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यावर ताण येणार नाही, असे भोसले यांनी सांगितले. यासाठी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांचे मार्गदर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.