VIDEO | महाद्वार उघडले : दोन वर्षांनंतर प्रथमच भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश; भाविकांमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 06:36 PM2022-04-02T18:36:22+5:302022-04-02T18:36:46+5:30

दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

alandi mahadwar opens devotees enter the temple for the first time in two years | VIDEO | महाद्वार उघडले : दोन वर्षांनंतर प्रथमच भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश; भाविकांमध्ये उत्साह

VIDEO | महाद्वार उघडले : दोन वर्षांनंतर प्रथमच भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश; भाविकांमध्ये उत्साह

Next

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी माऊली... माऊली... माऊली... नामघोषात थेट गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेतले. कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनंतर आजपासून भाविकांना पुन्हा एकदा माऊलींचा दरबार दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान गुढीपाडव्या निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून सिद्धिविनायकाचा गणेश अवतार साकारण्यात आला. माऊलींचे श्री गणेश अवतारातील हे मनमोहक रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. यापार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. त्यामुळे माऊली मंदिरही बंद होते. दरम्यान अलीकडच्या काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. माऊलींच्या मंदिरात भाविकांना नियम पाळून मुख दर्शन दिले जात होते. मात्र प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शनास बंदी होती. परंतु पाडव्याच्या शुभमुहूर्तावर समाधी स्पर्श दर्शनास सुरुवात केल्याने भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

तत्पूर्वी, माऊलींच्या मंदिरात पहाटे साडेतीन वाजता घंटानाद झाला. साडेपाचच्या सुमारास पवमान पूजा व दुधारती संपन्न झाली. विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते महापूजा घेण्यात घेऊन माऊलींना साखरगाठी अर्पण करण्यात आली. तद्नंतर ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय'' असा नामघोष करून भाविकांना प्रत्यक्षात 'श्रीं'च्या गाभार्‍यात प्रवेश देऊन स्पर्श दर्शन देण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळच्या सत्रात सुमारे पंधरा हजार तर सायंकाळपर्यंत एकूण वीस हजारांहून अधिक भाविकांनी नतमस्तक होत समाधीचे स्पर्श दर्शन घेतले. दर्शनानंतर ज्ञानेश्वर महाराज चरित समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे व उद्योजक रमेश आढाव यांच्यावतीने खिचडीचे वाटप करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

दुग्धशर्करा योग... भाविकांची गर्दी
पाडव्यापासून भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन मिळू लागले आहे. पाडवा आणि स्पर्श दर्शन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने हजारो भाविकांचा मेळा अलंकापुरीत दाखल झाला. कोरोनानंतर दोन वर्षांनी चंदन उटीतील गणेशाचा अवतार समाधीवर साकारण्यात आला. तर मंदिराचे महाद्वार खुले करण्यात आले. तत्पूर्वी, मंदिराच्या गाभाऱ्यात मोगऱ्याची तसेच महाद्वारात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 

व्यावसायिकांना दिलासा...

अलंकापुरीत माऊलींच्या दर्शनासाठी आज (दि.२) भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. कोविड १९ नंतर पहिल्यांदाच सणासुदीला आळंदी गजबजलेली दिसून आली. इंद्रायणी घाटावरही सकाळच्या सत्रात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील हार, फुल, नारळ, प्रसाद, खेळणी व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: alandi mahadwar opens devotees enter the temple for the first time in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.