आळंदीत पालखी मार्गाची अवस्था बिकट; खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:46 AM2021-09-29T10:46:50+5:302021-09-29T12:00:42+5:30
आळंदीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून लाखों रुपये खर्चून प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत
आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदीतील देहूफाटा चौकात संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून वाहतुक करावी लागत आहे. एकीकडे पालखी मार्गावर लाखों रुपये खर्च केला जात आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून तीर्थक्षेत्र आळंदीलगतच मार्गावर मोठं - मोठे खड्डे पडलेले आहेत. तर साईडपट्ट्याही उखडल्या आहेत. विशेष म्हणजे पालखी मार्गावरील खड्डे कायमस्वरूपी बुजले जावेत अशी सर्वसाधारण अपेक्षा असताना या खड्ड्यांना पॅच मारले जात आहेत. परिणामी वाहतुकीदरम्यान अडथळ्यांची शर्यत लागली जात आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीतून पुण्याकडे जाण्यासाठी प्रशस्त मार्ग आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पायी वारी करत याच मार्गाने जाते. मात्र देहू फाट्यावर मागील अनेक दिवसांपासून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. साइ़ड पट्ट्या उखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यातच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले जात आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न येऊन अनेक दुचाकी अपघातग्रस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित दुरुस्ती विभागाने खड्डे बुजविण्याचे धाडस केले आहे. मात्र रस्त्यांवरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यासाठी संपूर्ण लेनवर कार्पेट टाकणे आवश्यक असताना फक्त खड्ड्यांना पॅच मारले जात असल्याने स्थानकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
दसऱ्याला पेटणार साखर कारखान्यांची धुराडी; ऊस गाळपासाठी लगबग सुरु
मार्गावरील कामाबाबत स्थानिक नागरिक म्हणाले, पालखी मार्गावर केलेले पॅचिंग किती वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिटे, सेकंद टिकेल? याची शाश्वती देता येणार नाही. त्यातच अशा कामामुळे पैशांचा अपव्यय, स्थानिक तसेच वाहतुकदाराच्या मनाला खोटं समाधान, अपघाताची हमी, चिखल, निसरडा रस्ता, धुळीचा त्रास, दगड चाकाने उडून होणारे अपघात होणार आहे.
आळंदीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून लाखों रुपये खर्चून प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जेबाबत आळंदीकरांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या वेळी बॅरिकेट लावून रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्याचे काम केले जात आहे.