आळंदीकरांच्या नशिबी मैलामिश्रित पाणी
By admin | Published: April 27, 2017 04:48 AM2017-04-27T04:48:27+5:302017-04-27T04:48:27+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीतील जलशुद्धीकरण केंद्राला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना पिण्यासाठी
भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगाव
तीर्थक्षेत्र आळंदीतील जलशुद्धीकरण केंद्राला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. तसेच मागील काही महिन्यांपासून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना गढूळ मैलामिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिण्यासाठी वितरित केलेल्या पाण्याचा वापर नागरिकांना इतर वापरासाठी करावा लागत आहे. भाविकांकडून तसेच स्थानिक नागरिकांकडून हक्काचे स्वच्छ पाणी वितरीत करण्याची वारंवार मागणी करूनही नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.
आळंदी शहराला दररोज ५० ते ६० लाख लिटर स्वच्छ पाण्याची गरज आहे. शहरात स्वच्छ पाणी वितरीत करण्यासाठी इंद्रायणी नदीलगत वाटरप्रूप जलशुद्धीकरण केंद्र आहे. सध्या मात्र जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याच्या मशनिरी जुनाट झाल्या आहेत. परिणामी सांडपाणी मिश्रीत टाकीत आलेले पाणी पूर्ण क्षमतेने शुध्द होत नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात नळाद्वारे मलमिश्रीत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाद्वारे प्राप्त झालेल्या या पाण्याचा कुबट वास येत असून ते पिण्यायोग्य नसल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना जुलाब, उलट्या, साथीच्या रोगाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकही जलशुद्धीकरण केंद्रातून मिळालेल्या पाण्याचा वापर टाळण्यास पसंती देत आहेत. देवस्थानच्या विहिरीतून किंवा हवेली हद्दीतून ड्रमच्या साह्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात - लवकर जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करून शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.