कल्लेदार मिशांच्या मुसाफिराची आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 02:21 PM2023-06-12T14:21:30+5:302023-06-12T14:30:54+5:30
वारीतून वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, मतदान हक्क बजवा आदी सामाजिक विषयावर जनजागृती
बी.एम. काळे
जेजुरी : जगात अशक्य असे काहीच नाही असे आपण म्हणत असतो, मात्र ते शक्य करण्याबाबत मात्र आपली नेहमी उलटी चाल असते. म्हणने सोपे असते, करणे अशक्यप्राय वाटते, मात्र यंदा आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर आज असा एक उंचापुरा, बलदंड देहयष्टी असणारा, एम ए.( समाजशास्त्र ) उच्च शिक्षित, अगदी कानाच्या पाळीपर्यंत पोहोचलेल्या कल्लेदार मिशांचा मुसाफिर आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी करतोय. होय, उलटे पायी चालत तो वारी करतोय, त्याचे नाव आहे बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड, ( वय ५५ वर्षे) रा. फुरसुंगी, पुणे. आज त्याने जेजुरी ओलांडून निरेकडे प्रस्थान ठेवलेय.
आयुष्यात काहीतरी करायचे असे अनेकांना वाटत असते. त्यानुसार प्रयत्न ही सुरू होतो, मात्र पुन्हा तर अर्धवट राहते. मात्र या अवलियाने वयाच्या १६ व्या वर्षांपासून वारी सुरू केली आहे. पंढरीची वारी त्यासाठी आषाढी एकादशीच हवी असे नाही तर जेव्हा जेव्हा मनात येईल की आता आपण जनजागृतीसाठी बाहेर पडायला हवे, तेव्हा तेव्हा हा अवलिया घराबाहेर पडून उलटी पायी चालत वारी सुरू करतो. आजची त्याची ही ४३ वी वारी आहे.
वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, आरोग्य आणि स्वच्छता पाळा, मेरा देश मेरा परिवार या न्यायाने जगा, जगताना मतदान मात्र जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा ते करा. मतदान हा हक्क बजवायला विसरू नका आदी सामाजिक विषयावर जनजागृती करण्यासाठीच ही वारी करीत असल्याचे गुंड सांगतात. देवाची भक्ती करतो,तेवढ्याच मनोभावे भारत मातेची ही भक्ती करण्याची शिकवण आपल्या जनजागृती वारीतून देणाऱ्या बापूराव गुंड यांनी आजपर्यंत आपला फुरसुंगी येथील छोटासा कपड्याचा व्यवसाय सांभाळता सांभाळता जनजागृतीसाठी पुणे ते जंतर मंतर दिल्ली अशी २०१७ आणि २०२२ असे दोनवेळा वारी केलेली आहे. मुंबई मंत्रालयापर्यंत ६ वेळा, शिखरी काठ्यांच्या यात्रेत ६ वेळा, यावर्षी नवरात्रात दरवर्षी पुणे ते तुळजापूर अशी वाऱ्या केल्या आहेत.
उलटे चालत वारी करताना त्यांच्या विलक्षण पेहरावा कडे पाहून कुतूहलाने प्रवाशी त्यांच्या संपर्कात येतात. ,बोलतात यातून परिणामकारक जनजागृती होत आहे. या अनेक वाऱ्यातून त्यांनी अपघात का आणि कशामुळे होतात याचे अनेक अनुभव घेतले आहेत. लोकमत च्या माध्यमातून त्यांनी शासनाकडे एकच विनंती केली आहे. ' सरकार, अपघात रोखण्यासाठी रस्त्यांची करोडो रुपये खर्च करून कामे करतात. पण अपघात थांबले नाहीत. शासन अपघात रोखण्यासाठी काम करते की घडवण्यासाठी काम करते. हेच समजत नाही. शासकीय प्रतिनिधींनी खरेच अपघात रोखण्यासाठी काम करीत असतील तर मला जरुर भेटावे. वस्तुस्थिती मी सांगेन असे आवाहन ही त्यांनी केले आहे.