आळंदीत वैष्णवांचा मेळा
By admin | Published: November 19, 2014 04:35 AM2014-11-19T04:35:17+5:302014-11-19T04:35:17+5:30
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या ७१८व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी कार्तिकी एकादशीला आज साडेतीन लाखांहून अधिक वैष्णवांचा महामेळा अलंकापुरीत भरला आहे
आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या ७१८व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी कार्तिकी एकादशीला आज साडेतीन लाखांहून अधिक वैष्णवांचा महामेळा अलंकापुरीत भरला आहे. आज (मंगळवारी) कार्तिकी एकादशीनिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करून लाखो भाविकांनी ज्ञानदेवांच्या समाधीचे डोळे भरून दर्शन घेतले. पालखी नगर प्रदक्षिणेवेळी गर्दीने उच्चांक गाठला. नगरप्रदक्षिणामार्ग भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता.
इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, अजान वृक्ष, सिद्धेश्वर सुवर्ण पिंपळ, एकनाथ पार, पुंडलिकाचे देऊळ, नृसिंह सरस्वतीमहाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, चांगदेव भिंत, साईबाबा मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होती.
महानैवेद्यानंतर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याची सजावट व पोशाख परिधान करण्यात आला. चोपदारांच्या नेतृत्वाखाली व हैबतबाबांच्या दिंडीतर्फे दुपारी दीडच्या सुमारास माऊलींची पालखी सजविलेल्या रथातून मंदिर व नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडली. त्या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिमंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला सोहळा हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. या ठिकाणी सर्व दिंड्यावाल्यांची हजेरी घेऊन अभंग सादर करून सोहळा पुढे मार्गस्थ झाला.
आजोळ घरासमोरून विष्णू मंदिराशेजारून इंद्रायणी घाटाकडून सायंकाळी सहाच्या सुमारास पालखी सोहळा मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहचला. वीणामंडपात आरती घेऊन माऊलींच्या पादुकांना शेजघरामध्ये स्थापन करण्यात आले. नगरप्रदक्षिणेदरम्यान पालखीतील माऊलींच्या मुखवट््याचे दर्शन घेण्यासाठी वारकरी येत होते.
पालखी मंदिरात विसावल्यानंतर देवस्थानच्या वतीने मानकरी तसेच दिंड्याकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी दर्शनबारी खुली करण्यात आली. रात्री दहापासून मोझेकरांचा जागराचा कार्यक्रम झाला. खेडचे प्रांताधिकारी हिंमतराव खराडे यांच्या हस्ते द्वादशीची शासकीय पहाटपूजा करण्यात आली.