आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 03:39 PM2021-06-11T15:39:04+5:302021-06-11T15:39:19+5:30

२ जुलैला माऊलींचे आळंदीतून प्रस्थान, प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी

Alandi welcomes the decision taken regarding Ashadhiwari! Demand for strict implementation from villagers | आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या वारकऱ्यांना सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येईल अशांना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक

आळंदी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी गतवर्षीप्रमाणेच परंपरेचे पालन करून बसने पूर्ण होणार आहे. असा निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे आळंदी ग्रामस्थांकडून स्वागत होत असून घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे.

२ जुलैला तीर्थक्षेत्र आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी मुख्य समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी दिली आहे. तर मानाच्या दहा पालख्यांसाठी ५० जणांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक पालखीला दोन बसेस याप्रमाणे एकूण दहा पालख्यांना २० बसेस दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वारीसंदर्भातील अधिक विस्तृत आदेश शासन लवकरच काढणार आहेत. 

यापार्श्वभूमीवर यंदाही माऊलींची पालखी (चलपादुका) बसमधूनच पंढरपूरकडे जाणार आहे. वारी संबंधित घटक व मर्यादित वारकऱ्यांव्यतिरिक्त इतर वारकरी प्रस्थान सोहळ्याला तसेच दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या वारकऱ्यांना सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येईल अशांना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

यंदा आषाढी वारीसाठी संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपानकाका महाराज (सासवड) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर - अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर), संत चांगटेश्वर महाराज (सासवड) या दहा मानाच्या पालख्या पंढरीला विठुचरणी जाणार आहेत.

" आषाढी वारी संबंधित सर्व घटकांशी तसेच वारकऱ्यांची मते देवस्थानने जाणून घेऊन प्रशासनाकडे मांडली होती. राज्यसरकारने सर्व घटकांचा विचार करून वारी संदर्भातील निर्णय घेतला आहे. वारकरी संप्रदाय हा कधी एकट्याचा विचार करत नाही. वारकरी संप्रदाय समाजाचे हित सांभाळतो. प्रस्थान संदर्भातील अधिक तपशीवार नियोजन लवकरच देवस्थान ठरवील. प्रथेप्रमाणे नियोजित तारखेलाच माऊलींचे प्रस्थान होईल.
                                       - डॉ.अभय टिळक, प्रमुख विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी.

" राज्य शासनाने यंदाची आषाढी वारी गतवर्षी प्रमाणे बसने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आळंदीतील मानकरी म्हणून आम्ही स्वागत करतो. कोरोनाला कायमस्वरूपी संपवायचे असेल तर अशाच कौतुकास्पद निर्णयाची गरज होती.
                                    - पांडुरंग कुऱ्हाडे, मानकरी आळंदी.

Web Title: Alandi welcomes the decision taken regarding Ashadhiwari! Demand for strict implementation from villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.