आळंदीला शुद्ध पाणी मिळणार
By admin | Published: May 7, 2015 04:53 AM2015-05-07T04:53:11+5:302015-05-07T04:53:11+5:30
जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले
दिघी : जूनअखेर आळंदीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर मे अखेरीस नव्या वास्तूत रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले. रुग्णालयाच्या नूतन इमारतीमध्ये तत्काळ रुग्णसेवा चालू करावी व आळंदीकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सुरू असलेले बेमुदत उपोषण आमदार सुरेश गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आळंदी येथे रुग्णालयाची नवी भव्य इमारत बांधण्यात आली; परंतु नळजोडणी, वीजजोडणीसारख्या किरकोळ कारणामुळे या इमारतीमध्ये अद्यापही रुग्णसेवा सुरू करण्यात आली नाही.
आळंदी येथील नागरिक गेल्या १० वर्षांपासून अशुद्ध व प्रदूषित पाणी पीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून आळंदीकरांना तत्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. मंगळवारी (दि. ५) संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या महाद्वारासमोरच हे बेमुदत उपोषण सुरू होते. आळंदी येथील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी या उपोषणाला आपला पाठिंबा देत उल्लेखनीय प्रतिक्रिया नोंदवल्या.
उपोषणकर्त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मंगळवारी
(दि. ५) दुपारी ४ वाजता न. प.मध्ये तातडीची प्रशासकीय बैठक
घेण्यात आली. या बैठकीला
खेड येथील सा. बां. विभागाचे उपअभियंता काटकर, सहा. अभियंता मुरकुटे, वैद्यकीय अधिकारी पांढरे व मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.
दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळीच खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी आळंदीत येऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यासोबतच आळंदी येथील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, मुख्याधिकारी विनायक औंधकर व आरोग्य उपसंचालक चव्हाण यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या वेळी आमदार सुरेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी इमारतीच्या आतील भागातील किरकोळ कामे शिल्लक राहिल्यामुळे त्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या इमारतीतील रुग्णसेवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल.
यावर उपोषणकर्त्यांनी लेखी स्वरूपाची मागणी केल्याने मुख्याधिकारी औंधकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर आमदार गोरे व नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत पाजून उपोषण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मागे घेण्यात आले.
अलंकापुरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरीषकुमार कारेकर यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण येळवंडे, बंडुनाना काळे, तुकाराम माने, नाना कातखेडे, उमेश रानवडे यांचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश
होता. (वार्ताहर)