मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत तरुणाचे टाकीवर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 06:49 PM2023-10-29T18:49:54+5:302023-10-29T18:50:01+5:30

जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असे आंदोलकांने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे स्पष्ट केले

Alandi youth protest on tank for Maratha reservation demand | मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत तरुणाचे टाकीवर आंदोलन

मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत तरुणाचे टाकीवर आंदोलन

आळंदी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आळंदीत लक्ष्मीमाता चौकाजवळील पाण्याच्या टाकीवर एक आंदोलक चढला. जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असे आंदोलकांने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे स्पष्ट केले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरु आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी लातूर येथील एका माजी सरपंचाने आळंदी येथे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यात त्या व्यक्तीने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आपण आहुती देत असल्याची चिठ्ठी लिहिली होती.
           
त्यानंतर आळंदी येथे रविवारी (दि.२९) आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. आळंदी येथील लक्ष्मी चौकाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर ही घटना घडली. श्रीकांत काकडे हा तरुण हातात ‘एक मराठा, लाख मराठा मराठा आरक्षण’ असा मजकूर असलेला फलक घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला. टाकीवर जात असताना तरुणाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी हे पाउल उचलले असल्याचे म्हटले आहे. श्रीकांत याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, हे सरकार मराठ्यांना वेशीला टांगत आहे. मराठ्यांना आत्महत्या करण्यास हे सरकार प्रवृत्त करीत आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे. 
              
एकीकडे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तरुणांच्या भावना तीव्र होत आहेत. सरकारने याची त्वरित दखल घेतली पाहिजे. आरक्षण दिले नाही तर मराठा समाज या नेत्यांना फिरू देणार नाही. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान पोलीस व स्थनिकांच्या प्रयत्नांनी तरुणाची समजूत काढून त्याला सुरक्षित खाली उतरविण्यात यश मिळाले आहे.

Web Title: Alandi youth protest on tank for Maratha reservation demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.