हरिनामाच्या गजराने दुमदुमली अलंकापुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:08 AM2018-12-03T02:08:52+5:302018-12-03T02:08:59+5:30

संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या ७२३ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी उद्या, सोमवारी (दि. ३) लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने हरिनाम गजरात साजरी होत आहे.

Alankapuri by the haremama carrot | हरिनामाच्या गजराने दुमदुमली अलंकापुरी

हरिनामाच्या गजराने दुमदुमली अलंकापुरी

googlenewsNext

आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या ७२३ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी उद्या, सोमवारी (दि. ३) लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने हरिनाम गजरात साजरी होत आहे. मंगळवारी श्रींचा रथोत्सव होणार आहे. दरम्यान, येथील कार्तिकी यात्रेतील दशमी दिनी श्री पांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्याने आळंदीत श्रींच्या पादुकांची पालखीतून नगरप्रदक्षिणा करीत श्री पांडुरंग पादुकांना इंद्रायणी नदीत व नदीलगतच्या भागीरथी तीर्थकुंडात ज्ञानोबा-माऊली-तुकाराम, श्रीविठ्ठल नामगजरात जलाभिषेक करत रविवारी स्नान घालण्यात आले. या वेळी भाविकांनी श्रींच्या पादुका दर्शनास गर्दी केली. या वेळी झालेल्या हरिनामाच्या गजरामुळे अवघी अलंकापुरी दुमदुमली होती.
श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र आळंदी पायी वारी पालखी सोहळा प्रवेशाला आहे. येथील मुक्कामात हभप मल्लापा वासकर मठात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. श्री पांडुरंग पादुकांना इंद्रायणी स्नान करण्यास दिंडीने नामगजरात प्रारंभ झाला. येथील नगरप्रदक्षिणा मार्गावरून श्रींच्या पादुका पालखीतून नगरप्रदक्षिणेस निघाल्या. दरम्यान अभंग, नामजयघोषात पादुका इंद्रायणी नदीवर ११.३०च्या सुमारास आल्या. या मार्गावर भाविकांनी श्रींच्या पादुका दर्शनास गर्दी केली. या वैभवी पालखी सोहळ्यातील इंद्रायणी नदी स्नानास वासकरमहाराज यांच्यासह सोहळ्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम श्रींच्या पादुकांना इंद्रायणी नदीत स्नान झाले. त्यानंतर येथील भागीरथी कुंडात स्नान घालण्यात आले. हरिनामाच्या गजरात स्नान झाल्यानंतर श्रींचे पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या. येथून पुढे श्रींच्या पादुका पालखीतून वासकर फडावर दिंडीने आणण्यात आल्या.
श्री पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी श्री पांडुरंगाच्या पादुका पालखी सोहळा आळंदीला सुरु केला. श्री पांडुरंग माऊलींचे संजीवन समाधी दिन सोहळ्यास उपस्थित असतात, अशी भावना व वारकऱ्यांची श्रद्धा आहे. वासकरमहाराज यांच्या विनंतीप्रमाणे श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीने यास मान्यता दिली. श्री पांडुरंगरायांचा पादुका पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर ते आळंदी या मार्गावर पायी वारीस सुरु झाला आहे. सोहळ्यात यावर्षी रथाच्या पुढे १६, तर रथामागे १० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण व कर्नाटकातील वारकरी श्री पांडुरंगरायाचे पादुका पालखी सोहळा पायी वारीत सहभागी झाले आहेत. सतरा हजार वारकरी भाविक प्रवास करीत असल्याचे सोहळाप्रमुख मयूर ननवरे यांनी सांगितले.
>ंआज आळंदीत कार्तिकी एकादशी...
ंआळंदी कार्तिकी यात्रेतील एकादशी सोमवारी ( दि. ३) होत आहे. यानिमित्त माऊली मंदिरात पहाटपूजेत श्रींचा पवमान अभिषेक, दुधारती, ११ ब्रह्मवृंदांचा वेदमंत्र जयघोष होणार आहे. श्रींना महानैवेद्य, श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे. श्रींचे दर्शन व मंदिरात धुपारती व परंपरेने संतोष मोझे यांच्या वतीने जागर होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी सांगितले. द्वादशी दिनी ( दि.४) श्रींचा आळंदीत रथोत्सव होणार आहे. दरम्यान भविकांच्या स्वागताची मंदिरात तयारी पूर्ण झाल्याचे ढगेपाटील यांनी सांगितले.
>इंद्रायणीकाठ भाविकांनी फुलला...
राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा टाळ, वीणा, मृदंगाचा त्रिनाद करीत दशमी दिनी रविवारी हरिनामाचे गजरात केली. या वेळी गर्दीने तीर्थक्षेत्र अलंकापुरी, स्नानासाठी इंद्रायणी नदीकाठ फुलला. आळंदी कार्तिकी यात्रेस आलेल्या भाविक, वारकºयांचे हरिनाम गजराने भक्तीला उधाण आलेले दिसले. व्यापाºयांनी रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक दुकाने थाटली आहेत. विविध धार्मिक साहित्य खरेदीस भाविकांची गर्दी झाली. यावर्षी शहरात फुटपाथ निर्मितीने रहदारीला अडथळा झाला नाही. मात्र, काही ठिकाणी फुटपाथवर रहदारीला अडथळा झाल्याने भाविकांची गैरसोय झाली.
>श्रींचे पहाट पुजेसाठी निमंत्रितांना श्री हनुमान दरवाजाने त्यानंतर भाविकाना दर्शनास नवीन दर्शनबारीसह पान दरवाजाने, पास धारकाना हरिहरेंद्र स्वामीमठा समोरील देवस्थानच्या जिन्यातून मंदिरात दर्शनास प्रवेश देण्यात येत आहे. भाविकाना श्री'च्या दर्शनानंतर मुख्य महाद्वारातून बाहेर सोडण्यात येत आहे.दर्शनबारीतुन भक्ती सोपान पूल मार्गे मंदिरात हरिनाम गजरात प्रवेश करीत लाखो भाविकांनी हरीनाम गजर करत श्री'चे दर्शन घेतले. दर्शनबारी वाय जंक्शन पुढे गेल्याने भाविकांना दर्शनास सुमारे पाच तासावर वेळ लागला.

Web Title: Alankapuri by the haremama carrot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.