अलंकापुरीत पोलिसांचा चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:27+5:302021-07-02T04:08:27+5:30

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांचा १९१ वा आषाढीवारी प्रस्थान सोहळा जरी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असला, तरीसुद्धा वारीदरम्यान ...

Alankapuri police tight security | अलंकापुरीत पोलिसांचा चोख बंदोबस्त

अलंकापुरीत पोलिसांचा चोख बंदोबस्त

Next

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांचा १९१ वा आषाढीवारी प्रस्थान सोहळा जरी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असला, तरीसुद्धा वारीदरम्यान कुठलीही अनपेक्षित घटना घडू नये त्यादृष्टीने सुरक्षेला महत्त्व देण्यात आले आहे. आषाढी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन तसेच मंदिर देवस्थान कमिटी सज्ज झाली आहे.

आळंदीतून माऊलींच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शुक्रवारी (दि.२) प्रस्थान होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण आळंदी शहरात, तसेच आसपासच्या अकरा गावांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आळंदीला जोडणारे सर्व रस्ते अत्यावश्यक सेवा वगळता इतरांच्या प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. तर, शहरातील अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.

प्रस्थान सोहळ्यासाठी शहरात पोलीस प्रशासनाचा जादा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ५० पोलीस अधिकारी, २१० पोलीस अंमलदार, ९० होमगार्ड, दोन एसआरपीएफ तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक व घातपातविरोधी पथकाचा समावेश आहे. समाधी मंदिर व मंदिराचे लगत, प्रदक्षिणा रोड व आळंदी शहराबाहेरील ठिकाणी अशा तीन टप्प्यात नाकाबंदी व बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असल्यास आधार कार्ड किंवा ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.

चौकट : प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चाकण - शिक्रापूर महामार्गाकडून आळंदीकडे येणारी वाहतूक शेलगाव फाट्यापासून कोयाळीमार्गे मरकळला वळविण्यात आली आहे. पुणे - नगर महामार्गकडून आळंदीकडे येणारी वाहतूक मरकळमार्गे चाकण - शिक्रापूर हायवेकडे वळविली आहे. तर, पुण्याकडून आळंदीला येणारी वाहतूक भोसरीमार्गे पुणे - नाशिक मार्गाकडे वळविण्यात आली आहे.

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Alankapuri police tight security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.