‘मतदारराजा जागा हो’चा गजर
By admin | Published: February 19, 2017 05:09 AM2017-02-19T05:09:26+5:302017-02-19T05:09:26+5:30
मूलभूत कर्तव्य असूनही मतदारांकडून मतदान करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहरी भागातील मतदानाचा टक्का खूप कमी असतो. शहरात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये
पुणे : मूलभूत कर्तव्य असूनही मतदारांकडून मतदान करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहरी भागातील मतदानाचा टक्का खूप कमी असतो. शहरात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान ५५ टक्क्यांहून पुढे गेलेले नाही. हे चित्र बदलण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी यंदा कंबस कसली असून, ‘मतदारराजा जागा हो’चा गजर सर्वत्र होत आहे. जाहिराती, पथनाट्य, फलक, पोस्टर्स अशा विविध माध्यमांतून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे.
राज्यात महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले. ग्रामीणभागापेक्षा शहरी भागात मतदान कमी होत असल्याने येथील मतदारांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक निवडणूक यंत्रणांकडून अधिकाधिक मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. पुणे शहरात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले नाही. हा टक्का वाढविण्यासाठी मतदारांना आवाहन करणाऱ्या विविध जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत.
शहरातील विविध ठिकाणी ५५ होर्डिंग, महत्त्वाच्या रस्त्यांवरील ७७ मार्गफलक, तसेच ३७ हजार पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच प्रसिद्ध व्यक्तींकडून आवाहन करणाऱ्या चित्रफितीही तयार करून दाखविल्या जात आहेत.
(प्रतिनिधी)
सुमारे ५० हजार पत्रकांचे वाटप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना, तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडूनही पथनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी मतदानवाढीसाठी जनजागृती केली जात आहे. सुमारे १५ गट त्यासाठी काम करीत आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या पालकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
सुमारे ५० हजार पत्रके वाटण्यात आली आहेत. पीएमपी बस, सोसायट्या, रुग्णालयांबाहेर पोस्टर्स लावण्यात आली आहेत. विविध ठिकाणी नागरिकांच्या माहितीसाठी उपक्रमही राबविले जात आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदान हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे सकारात्मक चित्र पाहायला मिळेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.