दारूचा नाद आला जीवाशी; शेवटी चुलत भावानेच घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 04:15 PM2022-10-30T16:15:31+5:302022-10-30T16:16:10+5:30
खुनाचे गूढ अवघ्या २४ तासांत उलगडण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले
उरुळी कांचन : दारू पिण्याच्या नादाने अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली नेहमीच पाहण्यात येतात. या नादापायी अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागलेला असून अशाच एका घटनेत चुलत भावानेच भावाचा खून केल्याची घटना लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव पेठ (ता. हवेली) हद्दीत मार्ग वस्तीजवळ खून झालेल्या सुभाष चौधरी उर्फ बाबूतात्या (वय ५४) यांच्या खुनाचे गूढ अवघ्या २४ तासांत उलगडण्यास लोणी काळभोरपोलिसांना यश आले आहे. दारू पिण्याच्या वादातूनच बाबूतात्या यांचा खून करणाऱ्या चुलतभावाला लोणी काळभोर पोलिसांनीअटक केले आहे.
सुभाष भगवंत चौधरी (वय ५४, रा. वडाची वाडी, नायगाव, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संपत तुकाराम चौधरी (वय ४६, रा. वडाची वाडी पेठगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष यांचा मुलगा सौरभ सुभाष चौधरी (वय २३, रा. वडाची वाडी, नायगाव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव पेठ (ता. हवेली) हद्दीत मार्ग वस्तीजवळ सुभाष चौधरी उर्फ बाबूतात्या यांचा मृतदेह शनिवारी (ता. २९) आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बाबूतात्या यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचे कारण व संशयित आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सुभाष चौधरी आणि आरोपी संपत चौधरी हे चुलत भाऊ आहेत. ते म्हसोबा मंदिरासमोरील मार्ग वस्ती येथे शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका पेटला की, संपत याने सुभाष याच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात सुभाष हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी सुभाष यांचा मुलगा सौरभ चौधरी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी संपत चौधरी याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.