सिंहगडावर पर्यटकांची अल्कोहोल डिटेक्टर ने तपासणी करा : राजे शिवराय प्रतिष्ठान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:43 PM2019-07-15T18:43:50+5:302019-07-15T20:23:41+5:30
येत्या पंधरा दिवसांत या मागण्यांवर योग्य तो निर्णय न झाल्यास २८ जुलै रोजी व्यापक जनआंदोलन उभारून सिहंगड बंद करण्याचा इशारा दिला आहे.
पुणे : सिंहगडावर चोवीस तास व रोज आरोग्य सेवकासह अद्यावत रूग्णवाहिका असावी, किमान चार स्ट्रेचर उपलब्ध असावेत. घाट रस्त्यावरील संरक्षक कठड्याची उंची वाढविणे तसेच घाट रस्त्यावरील दरड कोसळण्याच्या संभाव्य जागी लोखंडी जाळे बसविणे आणि सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची अल्कोहोल डिटेक्टर ने तपासणी करणे अशा मागण्यांचे निवेदन राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने उपवनसंरक्षक अधिकारी लक्ष्मी ए. यांना दिले आहे.
येत्या पंधरा दिवसांत या मागण्यांवर योग्य तो निर्णय न झाल्यास २८ जुलै रोजी व्यापक जनआंदोलन उभारून सिहंगड बंद करण्याचा इशारा दिला आहे. सिंहगडावर हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र, गडावर पर्यटकांच्या सुरक्षेचा वेळोवेळी अभाव जाणवतो. नैसर्गिक आपत्ती, वन्यजीवांपासून हल्ले, रस्ते/गडांवरील अपघात अशा विविध दुर्घटनांमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नाही. नुकत्याच झालेल्या सिहंगड घाटातील रस्त्यांच्या कामामुळे संरक्षक कठड्यांची उंची रस्त्यांच्या समपातळीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे किल्ले सिहंगडावर दुदेर्वाने काही अपघात घडल्यास जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकेची सोय नाही. मद्यपान करून किल्ले सिहंगडावर येणारे नागरिक किंवा तरूणांना मज्जाव करण्यासाठीची यंत्रणा नसल्यामुळे घाट रस्त्यावर जीवघेणे अपघात घडू शकतात. अशा प्रकारच्या विविध दुर्घटनांमध्ये जखमींना नेण्यासाठी स्ट्रेचरची सोय गडावर नाही. गडावर उपलब्ध असलेल्या यंत्रणा इतक्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आजवर अनेक प्रकारचे अपघात या किल्ल्यावर घडले आहेत. काही अपघातांमध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे. अशा काही घटना भविष्यात घडू नये किंवा तसे काही घडल्यास तातडीची उपाययंत्रणा सिंहगडावर करावी, अशी मागणी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी केली आहे.