काय सांगता! कोरोना टाळेबंदीमुळे पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीत तब्बल अडीच कोटी लिटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:35+5:302021-04-16T14:12:59+5:30

विशाल शिर्के पिंपरी : टाळेबंदीमुळे तब्बल सहा महिने विक्री व्यवस्था विस्कळीत असल्याने गेल्या आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्यातील एकूण मद्य ...

Alcohol sales fell by 2.5 crore liters due to the ban | काय सांगता! कोरोना टाळेबंदीमुळे पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीत तब्बल अडीच कोटी लिटरची घट

काय सांगता! कोरोना टाळेबंदीमुळे पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीत तब्बल अडीच कोटी लिटरची घट

Next

विशाल शिर्के

पिंपरी : टाळेबंदीमुळे तब्बल सहा महिने विक्री व्यवस्था विस्कळीत असल्याने गेल्या आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्यातील एकूण मद्य विक्रीत सरासरी १६ ते १८ टक्के घट झाली आहे. बिअर विक्रीत सर्वाधिक ३६ टक्के घट झाली आहे. देशी दारू, विदेशी मद्य, बिअर आणि वाईन अशा विविध प्रकारच्या मद्यात २ कोटी ४२ लाख लिटरने घट झाली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. वाईन शॉप आणि बार रेस्टॉरंट बंद होते. मे २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात वाईन्स शॉपला परवानगी दिली. मात्र, रेस्टॉरंट आणि बारवरील निर्बंध कायम होते. मे महिन्यात वाईन्स शॉप सुरू झाल्यानंतर राज्यभरात वाईन्स शॉप बाहेर रांगा लावून मद्य खरेदी झाली. त्यामुळे महिन्याचा सुरुवातीचा आठवडा वाया गेल्यानंतर देखील विदेशी मद्याची महिन्याची सरासरी २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये २८ लाख ११ हजार ४०४ लिटरवरून २५ लाख ६१ हजार ५४३ लिटरपर्यंत खाली आली. त्यात अवघी ९ टक्के घट झाली.

रुग्ण बाधितांच्या संख्येनुसार सूक्ष्म कंटेन्मेंट क्षेत्र प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार त्या ठिकाणचे वाईन्स शॉप बंद होते. ही स्थिती सप्टेंबर २०२० पर्यंत कायम होती. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. सर्व वाईन्स शॉपही सुरू झाले. त्यानंतर मद्याचा खप हळूहळू वाढू लागला. मार्च २०२१ मध्ये सर्व प्रकारच्या मद्याची विक्री वाढली. उन्हाळ्यात बिअर मागणी वाढत असते. गेल्या वर्षी उन्हाळ्यातच टाळेबंदी लागल्याने बिअरच्या मागणीत मोठी घट झाली.

-----

गेल्या वर्षी कोविडमुळे एप्रिल महिन्यात वाईन्स आणि बार बंद होते. त्यानंतर कंटेन्मेंट झोननुसार बार आणि वाईन्स शॉप बंद होते. त्यामुळे वार्षिक मद्य विक्रीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

संतोष झगडे, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे

-----

मद्यविक्री लिटरमध्ये

मद्य प्रकार २०२०-२१ २०१९-२०

देशी २,५६,७७,३५५ २,९०,६७,८५१

विदेशी ३,१७,१५,५२६ ३,४७,८०,१७०

बिअर ३,२२,६८,४६९ ५,००,५२,५२१

वाईन १४,२६,०७९ १४,७२,१६८

-------

मार्च महिन्यात मद्य विक्रीत ४० टक्क्यांनी वाढ

मार्च २०२१ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मद्याची विकी चाळीस टक्क्यांनी वाढली आहे. देशी मद्याची २९,०४,०११ (४८ टक्के), विदेशी मद्य ३२,३९,५८८ (४० टक्के), बिअर ४५,८२,७५१ (३९ टक्के) आणि वाईन्सची विक्री १,६७,४२५ (२७ टक्के) लिटर झाली.

Web Title: Alcohol sales fell by 2.5 crore liters due to the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.