धनकवडीच्या बागा बनल्या मद्यपींचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 02:44 AM2018-11-06T02:44:30+5:302018-11-06T02:44:45+5:30
मद्यपी आणि प्रेमीयुगलांनी सोसायटीच्या गार्डन, अॅमेनिटी स्पेसवर (जागा) कब्जा केल्याचे चित्र धनकवडी येथील काही सोसायटी परिसरात दिसून येत आहे.
धनकवडी - मद्यपी आणि प्रेमीयुगलांनी सोसायटीच्या गार्डन, अॅमेनिटी स्पेसवर (जागा) कब्जा केल्याचे चित्र धनकवडी येथील काही सोसायटी परिसरात दिसून येत आहे. महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांना अशा अनोळखी व्यक्तींचा वावर त्रासदायक ठरत आहे.
धनकवडी परिसरातील मध्य वस्तीमध्ये बंगलो सोसायट्यांची संख्या जास्त आहे. हा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आणि शांत आहे. या परिसरातील रस्त्यावर वाहतूक अत्यंत कमी प्रमाणात असते. रहदारी नसल्यामुळे निर्मनुष्य परिसराचा फायदा घेत प्रेमीयुगलांनी या परिसरात अड्डा केला आहे. सोसायटीचे गार्डन आणि अॅमेनिटी स्पेस या मद्यपींसाठी हुकमी ठरत आहेत. या अनोळखी व्यक्तींच्या घुसखोरीमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलींसाठी असुरक्षित वातावरण ठरत आहे.
मद्यपान करताना होणारा आरडाओरडा, धिंगामस्ती, अनेकदा होणारे वाद याचा परिणाम रहिवाशांवर होत आहे. हटकणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांशी वाद आणि पर्यायाने अनेकदा हाणामारीही होत आहे. त्यामुळे वाद-विवादात न पडता निमूटपणे राहणाºया नागरिकांसाठी हा वावर सातत्याने धोकादायक ठरत आहे.
राजमुद्रा सोसायटी, राघवनगर सोसायटी, बाळकृष्ण सोसायटी, नित्यानंद सोसायटी, आदिशक्ती सोसायटी, रक्षालेखा सोसायटी, गुलाबनगर सोसायटीमध्ये या अनोळखी लोकांचा वावर रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे.
सकाळी, संध्याकाळी व रात्री हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या परिसरात पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवून कारवाई
करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
सोसायटीच्या परिसरात मद्यपी व प्रेमीयुगलांचा वावर आणि होणाºया गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोसायटींनी सुरक्षारक्षकांनी नेमणूक करावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, हा परिसर सीसीटीव्ही कॅमेºयांच्या कक्षेत आहे, असा फलक असेल तर हे प्रमाण निश्चितच कमी होईल त्याचप्रमाणे पोलिसांनीही सातत्याने कारवाया करण्याची गरज आहे.
- युवराज रेणुसे
सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यांवर, गार्डनमध्ये असे काही अनुचित प्रकार घडत असतील तर नागरिकांनी, सोसायटीमधील पदाधिकाºयांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही योग्य ती कारवाई करू तसेच मुख्य रस्त्यांवर आमचे पेट्रोलिंग सुरूच असते.
- अनिल शेवाळे, सहकारनगर
पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक