डोक्यात लाकडी फळी मारून मद्यपी पतीने पत्नीचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:25 PM2017-11-01T13:25:28+5:302017-11-01T15:00:49+5:30
माळीमळा परिसरात बुधवारी (दि. १) पहाटे सुवर्णा कांबळे (वय ३०) या महिलेचा मद्यपी पतीने डोक्यात लाकडी फळी मारुन खून केल्याची घटना घडली आहे.
लोणी काळभोर : येथील माळीमळा परिसरात बुधवारी (दि. १) पहाटे मद्यपी पतीने डोक्यात लाकडी फळी मारुन पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. तर घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला पतीने साडीच्या साह्याने फाशी घेतली आहे.
सुवर्णा किसन कांबळे (वय ३०, सध्या रा. माळीमळा, संजय गायकवाड चाळ, खोली क्रमांक ११, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत महिलेचे नाव असून पती किसन रामा कांबळे (वय ३५, दोघे मूळ रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मृत सुवर्णा यांची आई लक्ष्मी शहाजी साळवे (वय ५५, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे.
हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा हिस दोन मुली व एक मुलगा असून ट्रक ड्रायव्हर असलेला तिचा पती किसन हा दारू पिवून शिवीगाळ तसेच मारहाण करत असल्याने गेली ७ ते ८ वर्ष ती आपल्या तीन मुलांसह माळीमळा येथे खोली घेऊन राहत होती. ती मगरपट्टा सिटी हडपसर येथे धुण्याभांड्याची कामे करून उदरनिर्वाह करत होती. अधून-मधून तिचा पती किसन हा येथे येवून तिला मारहाण करत असे. ४ ते ५ वर्षापूर्वी सुवर्णा हिस लोखंडी गजाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. त्यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली होती.
दोन दिवसांपूर्वी किसन हा माळीमळा येथे आला. त्याने मद्यप्राशन केल्याने सुवर्णा हिने तुम्ही येथे राहू नका निघून जा, असे सांगितले. त्यावेळी दोघांत मोठे भांडण झाले होते. तेव्हापासून तो पत्नीवर चिडून होता. मंगळवारी (३१ आॅक्टो.) रात्री पत्नी त्याला टेरेसवर झोपावयास जा, असे म्हटल्याने त्या कारणावरून त्याने वाद घातला होता. त्यानंतर १०च्या सुमारास ते सर्वजण झोपी गेले.
सुवर्णा हिच्या राजश्री व धनश्री या दोन्ही मुली व्यायामाला जात असल्याने पहाटे ५-३०च्या सुमारास त्यांच्या मैत्रीणी त्यांना उठविण्यास आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता सुवर्णा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांनी राजश्री व धनश्री यांना उठवले. आपली आई निपचित पडली असून वडील घरात नाहीत हे पाहून त्यांनी आपल्या आजीला फोन करून बोलावले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. नंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रूग्णालयात पाठवण्यात आला. रात्री तिथे मुक्कामांस असलेला तिचा पती दिसत नसल्याने खून त्यानेच केला असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यांनी त्यादृष्टीने तपास करण्यास सुरूवात केली होती. घटनास्थळापासून पूर्वेस १०० मीटर अंतरावर सुनिल बाबुरांव गायकवाड यांची शेती आहे. ते आज सकाळी १०च्या सुमारास शेतीस पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना बांधावरील उंबराच्या झाडाला एकाने साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली. पोलीस तेथे पोहचल्यानंतर चौकशी केली असता किसन कांबळे याचा मृतदेह असल्याचे समजले.