Pune Crime: आळेफाटा पोलिसांच्या हातावर दिली तुरी; पॉस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी पळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:33 PM2024-01-27T12:33:41+5:302024-01-27T12:34:37+5:30
आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही. त्यामुळे जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे....
आळेफाटा (पुणे) : पोस्को कायद्याअंतर्गत पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपीला आळेफाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जुन्नर सबजेलमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असताना जुन्नर शहरातील परदेशपुरा जवळ आरोपीने वाहनाचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेत हातकडीसह पळ काढल्याचा प्रकार २६ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला. आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही. त्यामुळे जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अजय तानाजी मुठे (वय २२) रा. कोतूळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आळेफाटा पोलीस ठाण्यातील अमलदार भुजंग नारायण सुकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ जानेवारी रोजी अमलदार भुजंग सुकाळे, होमगार्ड कबीर सय्यद आळेफाटा पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर ७१६/२०२३ मधील पोलीस कोठडीमध्ये असणारा आरोपी अजय तानाजी मुठे याला पोलीस वाहनाने जुन्नर सबजेलमध्ये जमा करण्यासाठी नेत असताना जुन्नर शहरातील परदेश पुरा येथे नऊ वाजेच्या सुमारस आरोपीने वाहनाचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही. त्यानंतर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.