नीरा नदीकाठच्या गावांना अॅलर्ट, धरणातून विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:10 AM2018-08-27T00:10:09+5:302018-08-27T00:10:30+5:30
पाणीपातळीत वाढ : धरणातून विसर्ग
भोर : तालुक्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरादेवघर धरणाच्या पाच दरवाजांतून सुमारे ७१८८ क्युसेक्सने, तर वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्युसेक्स असा एकूण ७९३८ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू असल्याने नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाऊस वाढल्यास पातळीत अधिकच वाढ होणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील महाड-पंढरपूर रोडवरील सुमारे १२ टीएमसीचे संपूर्ण मातीचे धरण असून धरण १३ आॅगस्टलाच १०० टक्के भरले आहे. नीरादेवघर धरण भागात आज ५५ मिलिमीटर व एकूण २०४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आठवडाभरापासून पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने रविवारी सकाळी ११ वाजता धरणाच्या पाच दरवाजांतून विसर्ग सुरू केला आहे. एकूण ७९३८ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास नीरा नदीच्या पाणीपातळीत अधिकच वाढ होणार असल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.