डोक्यावर कर्जाचा डोंगर म्हणून पोटगी नाकारता येणार नाही; पतीला न्यायालयाचा दणका
By नम्रता फडणीस | Published: February 15, 2024 02:59 PM2024-02-15T14:59:19+5:302024-02-15T14:59:44+5:30
माझे उत्पन्न कमी आहे, माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामुळे मला पोटगी देणे शक्य होणार नाही असे पतीने सांगितले होते
पुणे : पतीचे विवाहबाहय संबंध समोर आल्याने पती-पत्नी दोघात वाद झाले. पतीने पत्नीला घराबाहेर काढले. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने पत्नीने पोटगीचीही मागणी केली. पण, माझे उत्पन्न कमी आहे, माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामुळे मला पोटगी देणे शक्य होणार नाही असे म्हणणार्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. तुमच्यावर कर्ज आहे म्हणून तुम्ही पत्नीला पोटगी देण्याचे टाळू शकत नाही असे सांगत, न्यायालयाने पत्नीला तीन हजारांची अंतरिम पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले आहेत.
एप्रिल 2023 पासून पतीला ही पोटगी पत्नीला द्यावी लागणार आहे. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने हा आदेश दिला. करण आणि रुपाली ( दोघांची नावे बदलेली) या दोघांची परिस्थिती बेताचीच. त्याचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले आहे. लग्नानंतर रुपालीचे बी.कॉमचे शिक्षण पूर्ण करण्याची तयारी त्याने दाखवली. त्यानुसार मे 2022 मध्ये ते दोघेही विवाह बंधनात अडकले. सासरी नांदत असताना रुपालीच्या समोर संसारात भविष्यात बाधा ठरणार्या विवाहबाहय संबंधांबाबत समजले. करणला याबाबत रुपालीने विचारले असता त्याने लग्नापूर्वीचे प्रेम असल्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाले. तिने त्यांच्या मोबाईलवरील चॅटिंग देखील पाहिले. त्यामध्ये त्याने समोरील मुलीला तू माझं पहिलं प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अशा आशयाचे मॅसेज पाठविले होते. त्यामुळे तिने त्याला विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले.
पतीने तिला घरातून हाकलून दिले. अवघ्या दीड महिन्यात तिने माहेर गाठले. त्यानंतर दोन महिन्यातच तिने अॅड. निखिल कुलकर्णी यांच्या मार्फत घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने
त्यांनी पोटगीचीही मागणी केली. दाव्यातील सर्व मुद्दे खोडण्यासाठी पतीने तिच्यावरच प्रत्यारोप केले. ती सोशल मीडियावर रिल्स बनविण्यात मग्न असते, सतत अपमान करते. माहेरी जाताना ती मोबाईल घेऊन गेल्याने माझी नोकरी गेली. माझ्यावर कर्ज असल्याने मी पोटगी देऊ शकत नसल्याचे म्हटले. मात्र दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने महिलेने केलेला पोटगीचा अंतरिम अर्ज मंजूर करत तीन हजारांची पोटगी मंजूर केली.