जुन्नरच्या उपनगराध्यक्षपदी अलका फुलपगार
By admin | Published: January 11, 2017 02:15 AM2017-01-11T02:15:07+5:302017-01-11T02:15:07+5:30
जुन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अलका फुलपगार निवडून आल्या.
जुन्नर : जुन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अलका फुलपगार निवडून आल्या. त्यांनी आपला माणूस आपली आघाडी व भाजपा यांच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवार कविता गुंजाळ यांचा ३ मतांनी पराभव केला. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्षपद व ५ नगरसेवक शिवसेनेचे असताना त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता.
उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अलकाताई फुलपगार यांचा एकमेव यांनी अर्ज दाखल दाखल झाला होता, तर आघाडीकडून कविता गुंजाळ यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ नगरसेवक होते. भाजप व आपल्या आघाडीचे व काँग्रेसचे ४ नगरसेवक होते.
खुल्या पद्धतीने हात वर करून झालेल्या मतदानात अलकाताई फुलपगार यांनी कविता गुंजाळ यांचा ७ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला. स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे शहरप्रमुख अविनाश करडिले व राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन गांधी बिनविरोध निवडून आले.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी नितीन गांधी यांचे तर शिवसेनेचे गटनेते दीपेश परदेशी यांनी अविनाश करडिले यांच्या नावाची शिफारस पत्राद्वारे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्याकडे केली.
शिवसेनेचे नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, शिवसेना गटनेते दीपेश परदेशी, नगरसेवक आविन फुलपगार, समीर भगत, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, माजी नगरसेवक श्याम खोत या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे, नगरसेवक फिरोज पठाण, अक्षय मांडवे, नगरसेविका अलकाताई फुलपगार, समीना शेख,
वैष्णवी गवळी, मोनाली म्हस्के,
बाजार समितीचे संचालक धनेश संचेती, धनराज खोत, अशोक लुणावत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर पालिका सभागृहात त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष श्याम पांडे, माऊली खंडांगळे, दिनेश दुबे, दीपेश परदेशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. फिरोज पठाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)
जुन्नरकर जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. नगरपालिकेचा कारभार करताना विकासकामांच्या बाबतीत कोणतेही राजकारण करणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम करू.
- अलका फुलपगार, उपनगराध्यक्ष
शिवसेना, राष्ट्रवादीची अभद्र युती : सोनवणे
जुन्नर : उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने संगनमताने ठरवून शिवसेनेचे नगरसेवक जाणीवपूर्वक तटस्थ राहिले.उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डावपेचाचा तो भाग होता. मागील सत्ता काळात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या भ्रष्ट कारभारावर पांघरून घालण्यासाठी त्यांची अभद्र युती करण्यात आलेली आहे, अशी टीका आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर येथे पत्रकार परिषदेत केली. मतदारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विकासाचे मॉडेलच्या प्रस्तावाचे काम श्मार्गी लावणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी संगीतले. (वार्ताहर)